
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
तरूण-तरूणींना अश्लील हावभाव अथवा अश्लील कृत्ये करण्यास जागा उपलब्ध करून देऊन त्याबदल्यात तासाप्रमाणे पैसे घेणार्या नगर शहरातील तीन कॅफे शॉपवर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे.
चाणक्य चौकातील रिच किंग कॅफे व कॅरेमेला कॅफे, भोसले आखाडा येथील बेला कॅफे या तीन कॅफेंवर ही कारवाई करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांकडून याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी कॅफेंची अचानक तपासणी केली असता हा प्रकार आढळून आला.
तसेच या कॅफेवर विना परवाना खाद्य गृहातून खाद्य पदार्थांची ग्राहकांना विक्री करताना आढळून आल्याने त्यांच्या विरूध्द महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अंमलदार सतीश भांड, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, योगेश खामकर, संदीप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, श्रीकांत खताडे यांच्या पथकाने केली आहे.