बूथ हॉस्पिटलची थकित रक्कम तातडीने देणार

दोन दिवसांत नवीन शववाहिका घेणार : आयुक्तांचे शिवसेना शिष्टमंडळाला आश्वासन
बूथ हॉस्पिटलची थकित रक्कम तातडीने देणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मनपा आरोग्य विभागाकडे असलेल्या शववाहिका या जुन्या झाल्या असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी येत्या दोन दिवसांत नवीन शववाहिका उपलब्ध करून देण्यात येतील. त्याचबरोबर करोना रुग्णांवर उपचार करणार्‍या बूथ हॉस्पिटलची महापालिकेकडील थकित रक्कम तातडीने अदा करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

शहरातील बूथ हॉस्पिटलमध्ये करोना रुग्णांवर चांगले उपचार केले जात आहेत. हॉस्पिटलने बेडची संख्याही वाढविलेली आहे. चांगले उपचार मिळत असल्याने अनेक रुग्णांना याच हॉस्पिटलमध्ये उपचार हवे आहेत. त्यातच मनपाने बूथ हॉस्पिटलचे बिल थकविले असल्याने नवीन रुग्णांना या हॉस्पिटलमध्ये प्रवेश देणे शक्य होत नाही.

याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी (ता. 19) महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. बूथ हॉस्पिटलची थकित रक्कम महापालिकेने तातडीने अदा करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सध्या करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, मयतांचे प्रमाणही वाढलेले आहे. महापालिकेकडे सध्या जी शववाहिका आहे ती 2008 ची असल्याने जुनी झाली असून, शव वाहतूक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याबाबत तातडीने नवीन शववाहिका खरेदी कराव्यात, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली.

केडगावमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने तेथे स्वतंत्र कोव्हिड सेंटर उभारावे, अशी मागणी यावेळी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केली. तसेच पीपीई कीट बाजारात 250 ते 300 रुपयाला मिळत असताना काही हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून 2 हजार रुपये वसूल केले जात आहेत. याबाबत महापालिका कोणतीच कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित करत गिरीश जाधव यांनी महापालिकेच्या ढिसाळ कामकाजावर बोट ठेवले.

या चर्चेवेळी आयुक्त मायकलवार यांनी स्पष्ट केले की, पीपीई कीट संदर्भात महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी वगळून इतर शासकीय विभागातील बारा अधिकारी-कर्मचार्‍यांची महापालिकेने नेमणूक केली असून, त्यांच्यामार्फत पीपीई कीटचे जादा पैसे वसूल करणार्‍या हॉस्पिटलची चौकशी करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर केंद्र सरकारच्या आराखड्यानुसार बूथ हॉस्पिटलकडून सर्व बिले मागवून घेऊन त्यांची थकित रक्कम तातडीने देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या चर्चेत महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, विजय पठारे, गिरीश जाधव, भगवान फुलसौंदर, परेश लोखंडे, विशाल वालकर आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com