
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
नगर ते राहुरी दरम्यान एसटी बसमध्ये प्रवास करत असलेल्या महिलेच्या बॅगमधील 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत व पाच हजार रुपये रोख रक्कम अज्ञात भामट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.
दीपमाला लाजरस कदम, (वय 40) या नाशिक येथील आंबड लिंक रोड, संजयनगर, येथे राहत आहेत. 10 मे रोजी सकाळी त्या त्यांच्या कुटुंबासह अहमदनगर येथे नातेवाईकांच्या लग्नाला गेल्या होत्या. लग्नाचा कार्यक्रम करून त्या कुटुंबासह सायंकाळी 6.30 वाजे दरम्यान माळीवाडा बस स्थानकावरून येवला जाणारे बसमध्ये राहुरीला जाण्यासाठी बसल्या होत्या. दरम्यान देहरे टोलनाक्याजवळ बस नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला थांबली होती.
त्यानंतर बस परत चालू झाल्यानंतर बस राहुरीकडे जाण्यासाठी निघाली. अंधार झाल्याने दीपमाला कदम यांनी त्यांच्या गळ्यातील पोत व पाच हजार रुपये रोख रक्कम त्यांच्या बॅगमध्ये ठेवली. रात्री 8.15 वाजेच्या सुमारास बस राहुरी बस स्थानक येथे थांबल्यावर त्या कुटुंबासह बसमधून उतरल्या. त्यावेळी त्यांनी बॅग तपासली असता त्यांच्या बॅगमधील सोन्याची पोत व पाच हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 45 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात भामट्याने चोरून नेल्याचे दिसून आले.
घटनेनंतर त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. दीपमाला लाजरस कदम यांच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्या विरोधात गुन्हा रजि. नं. 490/2023 भादंवि कलम 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.