बस प्रवासात नाशिकच्या महिलेचे 5 तोळ्याचे गंठण चोरले

भेंडा ते नेवासाफाटा दरम्यान घटना; दोन अनोळखी महिलांवर गुन्हा
बस प्रवासात नाशिकच्या महिलेचे 5 तोळ्याचे गंठण चोरले

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

शेवगाव ते नाशिक बसमधून प्रवास करत असताना नेवासा तालुक्यातील भेंडा ते नेवासाफाटा दरम्यान नाशिकच्या महिलेचे बॅगमध्ये ठेवलेले 5 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण अनोळखी महिलांनी चोरुन नेल्याची घटना काल रविवारी घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात महिलांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत उमा संतोष व्यवहारे (वय 41) धंदा-घरकाम रा. जुने नाशिक यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी नाशिकहून माझे माहेरी बोधेगाव ता. शेवगाव येथे माझ्या चुलत भावाच्या लग्नासाठी आलेले होते. तेथून 24 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता नाशिकला परतण्यासाठी शेवगाव बसस्थानकात आले होते. तेव्हा शेवगाव नाशिक ही बस (एमएच 14 बीटी 5077) बसस्थानकात उभी होती.

या बसने प्रवास करत असताना बस 11 वाजता भेंडा एसटी स्टॅण्डवर आली. तेव्हा बसमधील प्रवासी चढ-उतार झाले तेव्हा तेथून दोन अनोळखी महिला बसमध्ये चढल्या व माझ्या शेजारी येवून बसल्या. बस 11.20 वाजता नेवासाफाटा येथे आली तेव्हा शेजारी बसलेल्या दोन्ही महिला उतरल्या. त्यानंतर नेवासा फाट्याच्या पुढे बस आल्यावर माझ्याजवळील कपड्याची बॅग उघडून पाहिली असता मला बॅगमध्ये ठेवलेले माझे सोन्याचे गंठण दिसले नाही.

कंडक्टरला सांगून बस थांबविली व बॅग तपासली असता गंठण सापडले नाही. तेव्हा गंठण माझ्या शेजारी बसलेल्या दोन अनोळखी महिलांनी चोरुन नेल्याची खात्री झाली. 50 ग्रॅम वजनाचे (5 तोळे) त्यात काळे मणी असलेले हे जुने वापरते गंठण होते. सदर महिला मिळून आल्यास मी त्यांना ओळखेन.

या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी दोन अनोळखी महिलांवर चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार बाळकृष्ण ठोंबरे करत आहेत.

महिनाभरातील दुसरी घटना

शेवगाव ते नेवासाफाटा दरम्यान बस प्रवासात महिलांनी सहप्रवासी महिलेचे दागिने चोरल्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे. या आधीच्या घटनेत दागिने चोरीस गेलेल्या महिलेने त्याच दिवशी सायंकाळी नेवासाफाटा येथे चोरी करणार्‍या महिलांना ओळखले होते. त्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. आताच्या घटनेतही चोरी झालेल्या महिलेने सदर महिला दिसल्यास ओळखू शकते असा दावा केला आहे.

Related Stories

No stories found.