बसमध्ये चढत असताना 50 हजार रुपये लांबवले

श्रीरामपूर बस स्थानकातील घटना; प्रवासी रुईछत्तीसीचा
बसमध्ये चढत असताना 50 हजार रुपये लांबवले

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सोसायटीचे कर्ज भरण्यासाठी बहिणीकडून उसने पैसे घेऊन रुईछत्तीसी जवळील मठ पिंपरी या गावी जाण्यासाठी श्रीरामपूर बस स्थानकात नगर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने खिशातून 50 हजार रुपयांचा एक बंडल लांबविला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

नगर तालुक्यातील रुई छत्तीसी येथील मठ पिंपरी येथील दत्तात्रय महादू शेडगे यांना सोसायटी भरण्यासाठी पैशाची गरज होती. त्यांनी तशी मागणी त्यांच्या बहिणीकडे केली. त्यामुळे ते काल त्यांच्या बहिणीकडे 1 लाख रुपये घेण्यासाठी श्रीरामपूरला आले होते. बहिणीने उसने म्हणून दत्तात्रय शेडेगे यांना 50 हजारांचे दोन बंडल असे 1 लाख रुपये दिले. दत्तात्रय शेडगे यांनी हे दोन्ही बंडल त्यांच्या दोन्ही खिशात ठेवले होते. काल सकाळी ते आपल्या गावी जाण्यासाठी श्रीरामपूर बसस्थानकात आले. श्रीरामपूर-नगर या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने एका खिशातील 50 हजार रुपयांचा बंडल काढून घेतला. गाडीत शिटवर बसत असताना आपले 50 हजार रुपये कोणीतरी लांबविले असल्याचे कळाले. त्यांनी गाडीबाहेर पाहिले असता दोघांना मोटारसायकलवर बसताना पाहिले. त्यांनी आरडाओरड केली मात्र ते पसार झाले.

दत्तात्रय शेडगे यांनी बस चालक व वाहकास आपले 50 हजार रुपये चोेरीस गेल्याचे सांगितले. त्यानंतर ही बस प्रवाशासह पोलीस ठाण्यात नेली. बराच वेळ त्यांची कोणी दखल घेतली नाही. त्यामुळे प्रवाशी नाहक अडकून पडले होते. बसचे वाहक व चालकही पोलिसांना यांची तक्रार घ्या, अशी विनंती करत होते मात्र पोलिसांकडून वेळ लागेल, अशी उत्तरे मिळाली. अखेर बसमधील प्रवासी पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर त्यांची तक्रार लिहून घेऊन बस नगरकडे रवाना झाली.

Related Stories

No stories found.