बस चालकाला मारहाण

बस चालकाला मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

किरकोळ अपघातातून तिघांनी एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री माळीवाडा येथे घडली. कलीम मुन्शी सय्यद (वय 44 रा. बेलापूर खुर्द ता. श्रीरामपूर) असे मारहाण झालेल्या चालकाचे नाव आहे. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन अनोळखी व्यक्तीविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सय्यद हे महाराष्ट्र राज्य परीवहन मंडळाच्या शिवाजीनगर (पुणे) आगारात मागील 12 वर्षापासून काम करतात. ते दररोज पुणे ते औरंगाबाद नगर मार्गे एसटी बसच्या फेर्‍या करत असतात. ते सोमवारी विनावाहक शिवनेरी बस (एमएच 11 टी 9256) ही बस पुणे येथून घेऊन औरंगाबादकडे जात असताना माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ बसच्या पाठीमागून एक चारचाकी वाहन चिकटले होते.

तेव्हा चारचाकीचा चालक खाली उतरून सय्यद यांना म्हणाला,‘माझ्या गाडीचे नुकसान झाले आहे’, सय्यद यांनी खाली उतरून पाहणी केली असता गाडीचालक व त्याच्यासोबतच्या इतर दोघांनी काही न विचारता सय्यद यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांनी शिवनेरी बसची चावी काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सय्यद यांनी विरोध केला. तेव्हा देखील सय्यद यांना शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com