बुर्‍हाणनगरसह 42 गावच्या पाणीयोजनेला 195 कोटी 74 लाख मंजूर - आ.तनपुरे

 प्राजक्त तनपुरे
प्राजक्त तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगरसह 42 गावांतील पाणीपुरवठा योजनेसाठी 195 कोटी 74 लाख 97 हजार खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

राहुरीतील मुळा धरणातून थेट बुर्‍हाणनगर 42 गावे पाणीपुरवठा योजनेकरिता महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने दि.26 जुलै 2022 रोजी तांत्रिक मान्यता दिली होती. या पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार तनपुरे यांनी जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद पाणीपुरवठा अधिकार्‍यांची दि. 30 जुलै 2021 ते 18 जून 2022 पर्यंत तब्बल 10 वेळा बैठका घेऊन या योजनेत येणार्‍या अडीअडचणींवर मात करत ही योजना सुरळीत कशी चालेल? यादृष्टीने आराखडा तयार करण्यात आला होता.

तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे मुंबई येथेही मंत्रालय स्तरावर वेळोवेळी बैठका घेऊन या योजनेसाठी पाठपुरावा केला होता. या योजनेत मतदारसंघातील बहिरवाडी, धनगरवाडी, डोंगरगण, इमामपूर, मांजरसुंबा, ससेवाडी आदी गावांचा नव्याने आराखडा तयार करून समावेश करण्यात आलेला आहे.

आमदार तनपुरे म्हणाले, या योजनेतील मांजरसुंबा, डोंगरगण, पिंपळगांव माळवी, जेऊर, इमामपूर, शेंडी, पोखर्डी, धनगरवाडी, ससेवाडी, बहिरवाडी, पिंपळगांव उज्जैनी, आढाववाडी, वडगांव गुप्ता या गावांकरीता स्वतंत्र फिडर करण्यात आले आहे. या फिडरमुळे मोठ्या गावांना पाईपलाईनमुळे पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे. राहुरी, नगर, पाथर्डी विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांच्या अनेक पाणीपुरवठा योजना मार्गी लागल्या असून काही ठिकाणी प्रत्यक्ष कामांना सुरवातही झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

मतदारसंघातील रस्ते, वीज, पाणी या कामांसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगत जनतेच्या मुलभूत गरजांच्या कामांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. बुर्‍हाणनगर व 42 गावे पाणीपुरवठा योजना उत्कृष्ठ प्रकारची नव्याने करून पाणी प्रश्न मार्गी लावल्याने आमदार तनपुरे यांचे नगर तालुक्यातील लाभार्थी गावातील जनतेने आभार व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com