
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नवरात्र उत्सवामुळे बुर्हाणनगर (ता. नगर) येथील देवी मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे. या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दर्शनासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील दोन लाख 10 हजार रुपये किमतीचे दागिने चोरले. मंगळवारी (दि. 17) सकाळी साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान देवीच्या होमाजवळ ही घटना घडली.
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. मनीषा दिनेश ढुमणे (वय 48 रा. नंदनवननगर, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.बुर्हाणनगर येथील देवीच्या दर्शनासाठी मंगळवारी सकाळी भाविकांनी गर्दी केली होती. या गर्दीत चोरटेही घुसले. त्यांनी देवीच्या होमाजवळ जमा झालेल्या महिलांच्या गळ्यातील दागिन्यांवर डल्ला मारला. दोन मिनीगंठण, एक मनी मंगळसूत्र, एक सोन्याची चेन असे सुमारे दोन लाख 10 हजार रुपये किमतीचे सात तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.
दरम्यान, महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीला गेल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक (नगर शहर) अनिल कातकाडे, भिंगार कॅम्पचे सहा.पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. मनीषा ढुमणे यांच्या फिर्यादीवरून एकत्रीत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलीस अंमलदार नगरे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.