
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
घरात प्रवेश करून चोरी (Theft) करणार्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) गजाआड केले आहे. त्यांच्या ताब्यातून 3 लाख 25 हजाराचे सोन्यांचे दागिने (Gold Ornaments) व एक मोटारसायकल (Motorcycle) असा एकूण 3 लाख 75 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अरूण अभिमान काळे (वय 24, रा. पारनेर, ता. पाटोदा, जि. बीड), पवन भरत काळे (वय 19, रा. हरिनारायण आष्टा, ता. आष्टी, जि. बीड) अशी त्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर (LCB PI Dinesh Aher) यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक हेमंत थोरात, तुषार धाकराव, हवालदार सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना रवींद्र कर्डिले, विशाल दळवी, भीमराज खर्से, संतोष लोंढे, संदीप दरंदले, फुरकान शेख, रवींद्र घुगांसे, प्रशांत राठोड, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
गुन्हे शाखेचे पथक तिसगाव (ता. पाथर्डी) येथे रस्त्यावर सापळा लावून थांबले असताना, दोन इसम काळया रंगाच्या मोटारसायकलवरून येताना दिसले. पथकाने पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांनी त्यांची नावे अरूण अभिमान काळे व पवन भरत काळे अशी असल्याचे सांगितले. त्यांच्याकडील पिशवीत सोने आढळून आले. पाथर्डी (Pathardi) परिसरात घरात घुसून चोरी (Theft) केलेले सोने विक्री करण्यासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे अधिक चौकी केली असता, त्यांनी जय भवानी चौक व तनपूरवाडी (ता. पाथर्डी) घरात प्रवेश करून चोरी (Theft) केल्याची कबुली पोलिस पथकाला दिली.