दिवसा दोन फ्लॅट, दुकान फोडले

सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कमेची चोरी
दिवसा दोन फ्लॅट, दुकान फोडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सण-उत्सवाचे दिवस सुरू होताच शहरात चोर्‍या, घरफोड्यांच्या घटना वाढू लागल्या आहेत. कोतवाली हद्दीत दोन तर तोफखाना हद्दीत एका ठिकाणी मंगळवारी दिवसा घरफोडीची घटना घडली. यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व वस्तू चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. संबंधित पोलीस ठाण्यात याबाबत बुधवारी गुन्हे दाखल झाले आहेत.

मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास केडगाव उपनगरातील मोतीनगरमधील साई गॅलक्सी अपार्टमेंटमधील भक्ती भागवत गोवखरे (वय 32) यांचा फ्लॅट फोडून लहान मुलांचा ओम, चांदीचे पैंजण असे 17 हजार रूपयांचे दागिने चोरून नेले. गोवखरे यांनी कोतवाली पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. कोतवाली हद्दीत दुसरी घरफोडीची घटना गंजबाजारात घडली. मंगळवारी दुपारी माधवी महंत जक्कल (वय 62 रा. गोविंदपुरा) यांचे जक्कल प्रेमिंग वर्क्स या दुकानाच्या दरवाजाची लोखंडी फळी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. सोन्याची अंगठी, घड्याळ, पॉकेट, चांदीची नाणी, पितळी भांडी, रोख रक्कम असा 12 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला. जक्कल यांनी कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

मंगळवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान नगर-मनमाड रोडवरील गणेशनगरमधील सप्तशृंगी हाईट्समधील एक नंबरचा फ्लॅट फोडून रोख रक्कम व चांदीचे दागिने असा 36 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी राकेश राजेंद्र सायखेडकर (वय 34) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com