
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
भर दुपारच्या दरम्यान बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून घरातील सुमारे अकरा तोळे सोन्याचे दागीने चोरून नेले. ही घटना दि. 26 मे 2023 रोजी राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील आग्रेवाडी येथे घडली आहे.
राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील आग्रेवाडी येथे राहत असलेले रामदास चिमाजी गुलदगड, (वय 43 वर्षे) हे त्यांच्या पत्नी बरोबर दि. 26 मे 2023 रोजी दुपारी 2.15 वाजे दरम्यान घराला कुलुप लावून शेतात गेले होते. सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास ते घरी आले. तेव्हा त्यांना त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता दोन्ही कपटाचे दरवाजे उचकटलेले दिसले व कपाटातील सामान घरामध्ये आस्तवस्त पडलेले दिसले. या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आणि घरातील दोन्ही कपाटाचे दरवाजे उचकटून कपाटातील सुमारे पाच लाख रुपये किंमतीचे अकरा तोळे सोन्याचे दागीने तसेच दहा हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागीने चोरुन नेले.
घटनेची माहिती मिळताच राहुरी येथील पोलिस पथकाने घटनास्थळी हजर राहून घटनेची माहिती घेतली. परंतू अद्याप चोरट्यांचा काहीएक सुगावा लागला नाही. याच दरम्यान चिखलठाण येथील सुखदेव बालाजी काकडे यांच्या घराचे कुलूप तोडून 100 रुपये तसेच अनिल सुखदेव काकडे यांच्या घराचे कुलूप तोडून 15 हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. या घटनांमुळे म्हैसगाव व चिखलठाण परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रामदास चिमाजी गुलदगड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि नं. 571/2023 भादंवि कलम 380, 454 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.