दिवसा घर फोडून साडे पाच तोळे लांबवले

80 हजारांची रोख रक्कमही लंपास; पांगरमलची घटना
दिवसा घर फोडून साडे पाच तोळे लांबवले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घरी कोणी नसल्याचा फायदा घेत दिवसा घरफोडी करून साडे पाच तोळे सोन्याचे दागिने व 80 हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी दुपारी तीन ते सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास पांगरमल (ता. नगर) शिवारात घडली.

याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंढरीनाथ नाथा आव्हाड (वय 75 रा. पांगरमल) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी शेती व्यवसाय करतात. त्यांचे पांगरमल शिवारात राहते घर आहे. ते मंगळवारी त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावून कुटुंबासह बाहेर गेले होते.

दुपारी तीन वाजेच्यानंतर चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा, कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सामानाची उचकापाचक केली. एक तोळ्याची सोन्याची अंगठी, तीन तोळ्याची सोन्याची चेन व रोख 80 हजार रुपये असा एक लाख 47 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

दरम्यान सायंकाळी साडे पाच वाजता घर फोडून सोने, रोख रक्कम चोरीला गेली असल्याची माहिती आव्हाड यांना समजली. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com