
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
घर बंद करून मुलीकडे नागपूर येथे गेलेल्या वृध्द दांपत्याचे घर चोरट्यांनी फोडले. सामानाची उचकापाचक करून सुमारे सात तोळे सोन्याचे दागिने व 80 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला आहे. केडगाव उपनगरातील अंबिकानगरमध्ये 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा ते 11 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
याप्रकरणी वृषाली शरद कोलते (वय 80 रा. अंबिकानगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात 13 सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व त्यांचे पती शरद कोलते 1 सप्टेंबर रोजी सकाळी घर बंद करून त्यांच्या मुलीकडे नागपूर येथे गेले होते.
त्यांना 11 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता त्यांच्या शेजारी राहणारे मीना तोष्णीवाल यांनी घरात चोरी झाल्याचे फिर्यादी यांना सांगितले. यानंतर फिर्यादी व त्यांचे पती यांनी घरी येत पाहणी केली असता घरात ठेवलेली रोख रक्कम व दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.