
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील भामाठाण येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रकमेसह 3 लाख 99 हजार रुपये किंमतीचा ऐवज लांबविला. त्यात सुमारे साडेबारा तोळे सोन्याचे दागिने, पाच भाराचे चांदीचे दागिने व 1 लाख 81 हजार रोख रक्कम असा ऐवज आहे. काल दि. 21 मे 2023 रोजी रात्री 10:30 ते 22 मे रोजी पहाटे 4 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
भामाठाण येथील रमेश जगन्नाथ कुलकर्णी यांनी याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादित म्हटले आहे की, दि. 21 मे रोजी रात्री 10:30 ते 22 मे रोजी पहाटे 4 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या बेडरूममधील मागील दरवाज्याचा आतील बाजूचा कडीकोंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.
घरफोडीत 70 हजार रु. किंमतीचे 4 तोळ्याचे सोन्याचे गंठण 55 हजार रुपये किंमतीची 3 तोळ्याची मोहनमाळ, 30 हजार रुपये किंमतीचे दीड तोळ्याचे सोन्याचे छोटे गंठण, 10 हजार रुपये किंमतीची अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी, 20 हजार रुपये किंमतीची 1 तोळ्याची सोन्याची साखळी, 16 हजार रुपये किंमतीचे 8 ग्रॅम वजनाचे कानातील झुबे, 8 हजार रुपये किंमतीचे 4 ग्रॅम वजनाची ब्रायलेट रिंग, 1 हजार रुपयाची सोन्याची नथ, 6 हजार रुपये किंमतीच्या 3 अंगठ्या, 2 हजार रुपये किंमतीचे चांदीचे दागिने व 1 लाख 81 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 3 लाख 99 हजार किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे.
या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे निरिक्षक श्री. चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली. नगर येथून श्वान पथकास व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून फिर्यादिवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास श्रीरामपूर तालुका पोलिस करीत आहेत.