घरफोडी करून कापूस चोरणारा सराईत जेरबंद

श्रीगोंदा पोलिसांनी शिरूर तालुक्यातून केली अटक
घरफोडी करून कापूस चोरणारा सराईत जेरबंद

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

तालुक्यातील म्हातारपिंपरी येथे घर फोडून कापूस चोरणार्‍या अट्टल गुन्हेगारास श्रीगोंदा पोलिसांनी सापळा रचून बाजार समितीत शिताफीने जेरबंद केले.

रवींद्र उर्फ रवि चलास भोसले (रा. गणेगाव, ता. शिरूर, जि.पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव येथे 30 ऑक्टोबर रोजी कृष्णा सत्यवान कुरुमकर यांच्या खोलीच्या भिंत फोडून 3क्विंटल वजनाचा कापूस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद झाली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले करत असताना त्यांना सराईत रवींद्र उर्फ रवि चलास भोसले याने ही चोरी केल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.

त्यानुसार 6 नोव्हेंबर रोजी भोसले हा श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीगोंदा येथे चोरीचा कापूस विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना समजली. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचून बाजार समितीच्या गेटवरच आरोपी रविंद्र भोसले यास चोरलेल्या कापसासह पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने म्हातारपिंप्री येथे घरफोडी करून कापूस चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून दीड क्विंटल कापूस, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल यासह एक लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

रवींद्र भासेले हा मोठमोठ्या अनेक गुन्ह्यांमध्ये फरार असून अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, या जिल्ह्यांत वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास सहायक फौजदार विठ्ठल बडे करीत आहेत. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, अंकुश ढवळे, गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादासाहेब टाके, अमोल कोतकर, रविंद्र जाधव यांनी ही कामगिरी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com