
कर्जत |प्रतिनिधी| Karjat
पहिल्या राज्यस्तरीय महाराष्ट्र केसरी बैलगाड्याचा मान वाई (ता. सातारा) च्या सचिन चव्हाण यांच्या गाड्याने पटकावला. या शर्यतीला महाराष्ट्राच्या विविध भागातील बैलगाडा प्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग घेतला. या शर्यतीचा थरार, काळजाचा ठोका चुकविणार्या अटीतटीच्या लढतींनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
कर्जत येथे आ. रोहित पवार यांच्या पुढाकारातून या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आज महाराष्ट्राच्या विविध भागातून 500 पेक्षा अधिक बैलजोडींनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत एकूण 22 लाख रुपयांची बक्षिसे विजयी झालेल्या स्पर्धकांना देण्यात आली.
गेल्या काही वर्षांत यांत्रिकीकरणामुळे बैलांचा वापर शेतीसाठी काही प्रमाणात कमी झाल्याचेही निदर्शनास येत आहे. पण अशा स्पर्धा आयोजित केल्यामुळे शेतकरी आणि बैलाचे नाते आणखी घट्ट होईल आणि त्याला एक नवे वळण मिळेल तसेच आपली परंपरा जोपासली जाईल हा महत्त्वाचा हेतू ही स्पर्धा आयोजित करण्यामागे आहे, असे आ. रोहित पवार यांनी यावेळी म्हटले.
या स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी राज्यमंत्री अदिती तटकरे आणि राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह आ. अशोक पवार, आ.अनिल पाटील, आ. संग्राम जगताप, आ. आशुतोष काळे, आ. निलेश लंके, आ. राजू नवघरे, भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले , आ. संजय शिंदे, आ. दिलीप बनकर, आ. यशवंत माने, आ. इंद्रनील नाईक , आ.अतुल बेनके, आ. ऋतुराज पाटील, आ. झीशान सिद्दिकी, आ. राहुल जगताप यांची हजेरी होती.
विजेते आणि बक्षिसे
प्रथम क्रमांकाचे 2 लाख 22 हजाराचे बक्षिस सचिन चव्हाण यांनी पटकावले. द्वितीय क्रमांकाचे 1 लाख 11 हजाराचे बक्षिसय माळशिरसच्या तांबोळी यांच्या राणा ग्रूपने पटकावले. तर तृतीय क्रमांकाचे 77 हजार 777 रूपयांचे अक्षिस किशोर भिलारे यांनी पटकावले सर्वाुंना सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले आहे.