
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
जिल्हाधिकारी यांची परवानगी नसताना राहुरी तालुक्यातील चिंचाळे फाटा येथे बिरोबा देवस्थान यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत भरविणार्या चौघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, ताहाराबाद रोड लगत चिंचाळे येथे सोमवारी बिरोबा देवस्थानची यात्रा होती. या यात्रेनिमित्त जिल्हाधिकारी यांची कुठलीही परवानगी नसताना बैलगाडा शर्यत भरविल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस यात्रेस्थळी दाखल झाले असता 40 ते 50 बैलगाडा धावकांच्या मदतीने घोडे बैलगाडा हारजीतची शर्यत लावून गाड्यांना जुंपलेल्या घोडे, बैलांना अधिक वेगाने पळावे, याकरिता त्यांना बैलगाडा धारकांनी त्यांचे हातातील चाबकाने घोडे, बैलांचे पाठीवर पायावर मारून तसेच त्यांचे शेपटा पिरगाळून त्यांना अधिक वेगाने पळण्याकरिता क्रूरपणे वागवून शर्यत घेऊन स्वतःचे तसेच तेथील लोकांच्या मनोरंजनाकरिता शर्यत घेताना मिळून आले.
दरम्यान याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल जानकीराम खेमनर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात सोन्याबापू चिमाजी कोळसे, बापूसाहेब राणोजी गडदे, योगेश सोपान गडदे, संदीप भागवत बाचकर (सर्व रा. गडदे आखाडा ता. राहुरी) या चौघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय दंड कलम 188, प्राण्यांना निर्दयतेने वागविणेस प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रामनाथ सानप करीत आहे.