बजेटमध्ये श्रीरामपूर मतदारसंघातील महत्त्वाचे रस्ते मंजूर

आ. कानडे
आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

सत्तांतरानंतरच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये देवळाली प्रवरा टाकळीमिया ते तिळापुर पर्यंतच्या रस्त्यासाठीही पुरवणी अंदाजपत्रकामध्ये रुपये 9.50 कोटींची तरतूद होऊन मंजूर असल्याने राहुरी तालुक्यातील श्रीरामपूर मतदारसंघांमध्ये समाविष्ट असणार्‍या पूर्वेकडील गावांसाठीचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. याशिवाय श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम कार्यालयासाठी नवीन इमारत बांधकामासाठी निधी मंजूर झाला असून त्या महत्त्वाच्या कार्यालयांचा इमारतीचा प्रश्न मार्गी लागला आहे.

सत्तांतरानंतरही आ. लहू कानडे यांनी मतदारसंघातील महत्त्वाची कामे मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री, बांधकाम मंत्री यांना सतत निवेदने देऊन आणि प्रत्यक्ष भेटून मतदारसंघातील किमान महत्त्वाच्या कामांसाठी मंजुरी देऊन आर्थिक तरतूद करण्याची मागणी केल्यानंतर कालच्या अंदाजपत्रकामध्ये श्रीरामपूर मतदारसंघातील महत्त्वाची कामे मंजूर झाली आहेत. यात मतदार संघाघील महत्वाचे रस्ते मंजूर झाले आहेत. अखेर आ. लहू कानडे यांनी सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे हे यश मिळाले.

कोल्हार-बेलापूर या महत्त्वाच्या रस्त्यासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर बेलापूर बेलपिंपळगाव रस्त्यासाठी 4 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, यामुळे कोल्हार ते बेलपिंपळगाव पर्यंतच्या रस्त्याचे नूतनीकरण होणार आहे. श्रीरामपूर मधील महत्त्वाचा असलेला पुणतांबा ते श्रीरामपूर या रस्त्यासाठी 3 कोटी रुपये मंजूर झाल्याने हा अत्यंत खराब झालेला रस्ताही नव्याने बांधला जाणार आहे. उंदीरगाव माळेवाडी रस्त्याचा दर्जा उन्नत करून मागील बजेटमध्ये उंदीरगाव ते माळेवाडी रस्त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली होती.

या वर्षाच्या बजेटमध्ये माळेवाडी ते सरला बेट रस्त्यासाठी 5 कोटी रुपये मंजूर झाल्याने तीर्थक्षेत्र सरला बेटाकडे जाण्याचा उंदीरगाव ते सरला बेट अखंड रस्ता आता तयार होणार आहे. याशिवाय रामा 36 ते केशवबन रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील गावांना जोडणारा रस्ताही चांगल्या पद्धतीने तयार होणार आहे.

यापूर्वीच सी आर एफ मधून गंगापूर चिंचोली ते चांदेगावपर्यंतचा अर्धा रस्ता तयार करण्यात आला असून उर्वरित रस्त्याचे काम सुरू असल्याने प्रवराकाठाच्या या सर्वच गावांचे दळणवळणाचे प्रश्न सुलभ होणार आहेत. आ. लहू कानडे यांनी या निमित्ताने या महत्त्वाच्या कामांच्या मंजुरी बद्दल समाधान व्यक्त केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com