
अहमदनगर (प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर येथील मौलाना अब्दुल कादिर हे के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाचे पदाधिकारी आहेत. त्यांनी औरंगजेब याच्याबद्दल गौरव करणारे विधान करून औरंगजेब आदर्श असल्याचे म्हटले आहे. यामुळे हिंदू बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करावी. या पक्षाला कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमास फलक अथवा रॅलीसाठी शहरात जागा व परवानगी देऊ नये. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा हिंदूराष्ट्र सेनेने दिला आहे.
हिंदूराष्ट्र सेनेने बीआरएसच्या सावेडी उपनगर परिसरातील होर्डिंग्जला काळे फासून निषेध केला. त्यानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय आडोळे, शहर प्रमुख निखिल धंगेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनात म्हटले की, मौलाना अब्दुल कादिर यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण केले आहे. राज्यभर या पक्षाचे होर्डिंग्ज लागलेले आहेत. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजा यांच्यासह महामानवांचे ही फोटो वापरले आहेत. मात्र, औरंग्याचे उदात्तीकरण हे लोक करत आहेत. हे उदात्तीकरण आम्ही खपवून घेणार नाही. त्यांच्या विधानामुळे लाखो शिवशंभू प्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यातून राज्याची शांतता, सलोखा धोक्यात आणण्याचे धोरण दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.