नगरसह राज्यातील बीआरएस कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल !

चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचे महाराष्ट्रात भवितव्य काय ?
नगरसह राज्यातील बीआरएस कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल !

राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाकांक्षा निर्माण झालेल्या चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राष्ट्र समिती या आपल्या पक्षाचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती असे केले. तेलंगणाबाहेर महाराष्ट्रावर चंद्रशेखर राव यांनी लक्ष केंद्रित करून अन्य पक्षातील नेत्यांना प्रवेश देऊन ‘ताकद’ दिली. पण तेलंगणातच चंद्रशेखर राव यांचा पराभव झाल्याने राज्यात या पक्षाचे भवितव्य काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाकांक्षेलाही खीळ बसली आहे. परिणामी या पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.

तेलंगणाबाहेर भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना, शिवसेनेसह विविध पक्षांच्या नेत्यांना गळाला लावण्यात आले.काही नेते मंडळींना सारी ‘ताकद’ देण्यात आली. नगरसह राज्यातील विविध भागातील कार्यकर्त्यांनी तेलंगणाला भेट दिली. तेथील या पक्षाचे काम पाहुन त्यांना भुरळ पडली. व येथेही हा पक्ष रूजविण्याचा आणि विकास घडिविण्याची स्वप्ने अनेकांना पडू लागली. त्यातून ठिकठिकाणी बैठकांचा सिलसिलाही सुरू झाला. पदाधिकारी नेमण्यात आले. पक्षाच्या वतीने नागपूर, पुणे, सोलापूर, संभाजीनगर, नवी मुंबई आदी शहरांमध्ये कार्यालये सुरू करण्यात आली.

चंद्रशेखर राव यांच्या राज्यात ठिकठिकाणी जाहीर सभा झाल्या. त्यासाठी तेलंगणातून सारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. ‘रयतु बंधू’ ही शेतकर्‍यांना मदत देणारी योजना महाराष्ट्रात लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले. चंद्रशेखर राव यांनी राज्यात दौरा केला पण त्याचबरोबर दिग्गज नेते शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आदी नेत्यांच्या भेटी घेतल्या. चंद्रशेखर राव यांच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील प्रस्थापित नेत्यांना त्याची दखल घ्यावी लागली होती. चंद्रशेखर राव यांचा पक्ष हा राज्यात भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करीत असल्याचा आरोप झाला होता.

तेलंगणातील पराभवामुळे चंद्रशेखर राव यांच्या राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका बजाविण्याच्या योजनेला खीळ बसली आहे. तेलंगणातील पराभवामुळे राज्यातील नेत्यांना मिळणारी रसदीही कमी होण्याची चिन्हे आहेत. यामुळेच राज्यात मोठी घौडदौड करण्याची योजना असलेल्या भारत राष्ट्र समितीच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. चंद्रशेखर राव यांच्याबरोबर गेलेल्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये साहजिकच चलबिचल सुरू झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com