लाचप्रकरणी महिला कर मापकास सक्तमजुरी

प्रधान जिल्हा विशेष न्यायाधीश यांचा निकाल
लाचप्रकरणी महिला कर मापकास सक्तमजुरी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

10 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात येथील भू कर मापक अधिकारी ज्योती संदीप नराल-डफळ हिला न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी धरून चार वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. प्रधान जिल्हा विशेष न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी हा निकाल दिला. सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकिल अर्जुन बी. पवार यांनी काम पाहिले.

नगर तालुक्यातील एका शेतकर्‍याने भूमी अभिलेख कार्यालयात जमिनीची पाच तुकड्यांत मोजणी करण्यासाठी अर्ज करून सरकारी मोजणी फी भरलेली होती. त्याप्रमाणे भूकरमापक अधिकारी ज्योती नराल यांनी मोजणी करून नकाशा संबंधित शेतकर्‍याला दिलेला होता. परंतु मोजणीप्रमाणे पाच तुकड्यांत निशाणी नकाशाप्रमाणे प्रत्यक्ष जमिनीवर दिलेल्या नव्हत्या. यासंदर्भात संबंधित शेतकर्‍याने नराल यांची भेट घेऊन प्रत्यक्ष जमिनीवर निशाणी देण्याबाबत विनंती केली असता त्यांनी करून दिलेल्या मोजणीसाठी पाच तुकड्यांचे प्रत्येकी दोन हजार प्रमाणे एकूण 10 हजार रुपये लाचेची मागणी केली.

याप्रकरणी संबंधित शेतकर्‍याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. लाचलुचपत विभागाने नराल यांना लाचेची रक्कम स्विकारताना पंच साक्षीदारांसमक्ष रंगेहाथ पकडले. त्यांना अटक करून त्यांच्याविरूद्ध तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक श्याम पवरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर केसमध्ये एकूण चार साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली. त्यामध्ये तक्रारदार, तपासी अधिकारी व पंच साक्षीदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. या खटल्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के व पैरवी अधिकारी सहा.फौजदार लक्ष्मण काशिद यांनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com