500 रूपये लाच मागणार्‍या महसूल सहायकाविरूध्द गुन्हा

500 रूपये लाच मागणार्‍या महसूल सहायकाविरूध्द गुन्हा

'या' तहसील कार्यालयातील प्रकार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

500 रूपयांची लाच मागणी केल्याप्रकरणी शेवगाव तहसील कार्यालयातील महसूल सहायकाविरूध्द शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज रामचंद्र जाधव (वय 39 रा. शेवगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या महसूल सहायकाचे नाव आहे. शेवगाव तालुक्यातील सामनगाव येथील एक व्यक्ती व त्यांचे नातेवाईक यांचे जमिनीवर गौण खनिज साठा मिळून आला म्हणून शेवगाव तहसीलदार यांनी त्यांना 34 लाख 50 हजार 425 रूपये दंड करून सदर दंड रक्कम त्यांच्या 7/12 वर बोजा म्हणून नोंदविली होती.

सदर कारवाई विरोधात त्या व्यक्तीने उपविभागीय दंड अधिकारी, पाथर्डी यांच्याकडे आपील केली होती. आपीलमध्ये तहसीलदार यांचा आदेश रद्द करण्यात आला होता. उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाचे अनुषंगाने 7/12 वरील बोजा कमी करण्याबाबतचे तहसीलदार यांचे पत्र संबंधीत तलाठी यांना देण्याकरीता महसूल सहायक जाधव याने सामनगाव येथील व्यक्तीकडे 500 रूपयांची मागणी केली. त्या व्यक्तीने नगर लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

लाचलुचपत विभागाने 24 ऑगस्ट, 2022 रोजी पंचासमक्ष केलेल्या लाचमागणी पडताळणीदरम्यान जाधव याने तक्रारदार यांच्याकडे 500 रूपयांची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शवली होती. म्हणून जाधवविरोधात लाचलुचपत विभागाने शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस अंमलदार रमेश चौधरी, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, राहुल डोळसे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com