30 हजाराची लाच; पोलिसासह खासगी व्यक्तीला पकडले

नाशिक लाचलुचपत विभागाची नगरमध्ये कारवाई
30 हजाराची लाच; पोलिसासह खासगी व्यक्तीला पकडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अवैधरित्या दारू विक्री करण्यासाठी परवानगी देवून महिना 30 हजार रूपयांचा हप्ता घेणार्‍या पोलीस अंमलदारासह खासगी व्यक्तीला लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने अटक केली आहे. अंमलदार शैलेश गोमसाळे व खासगी व्यक्ती वैभव साळुंके (वय 35 रा. नगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी पाईपलाईन रोडवरील एकविरा चौक परिसरात ही कारवाई करण्यात आली. तोफखाना हद्दीतील तक्रारदार यांना विना परवाना दारू विक्री करण्याची परवानगी देवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात गोमसाळे याने खासगी व्यक्ती साळुंके यांच्यामार्फत तक्रारदाराकडे 30 हजार रूपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती.

दिलेल्या तक्रारीवरून 21 जुलै रोजी लाच मागणी पडताळणीदरम्यान लाच मागितल्याचे सिध्द झाले होती. दरम्यान मंगळवार, 2 ऑगस्ट रोजी एकविरा चौक परिसरातील सिटी स्टोअरजवळ खासगी व्यक्ती साळुंके याने गोमसाळे याच्यावतीने तक्रारदार यांच्याकडून 30 हजार रूपयांची रक्कम स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक साधना इंगळे, पोलीस अंमलदार सचिन गोसावी, प्रफुल्ल माळी, चंद्रशेखर मोरे, शरद हेंबाडे, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com