नववधूनं प्रियकरासमवेत दागिन्यांसह ठोकली धूम
सार्वमत

नववधूनं प्रियकरासमवेत दागिन्यांसह ठोकली धूम

श्रीगोंदा तालुक्यातील घटना

Arvind Arkhade

श्रीगोंदा|प्रतिनिधी|Shrigonda

लग्न झाल्यानंतर अवघ्या एक महिन्याच्या आत घरातील 1 लाख 55 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन नववधू प्रियकरासोबत आळंदी येथे पळाली. तिथे जाऊन त्या दोघांनी लग्न केले. तालुक्यातील हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी संबंधित पहिल्या पतीनेच आपली पत्नी व तिच्या प्रियकराविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

बारामती तालुक्यातील एका मुलीचे 25 जूनला श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथे राहणार्‍या तरुणाबरोबर लग्न झाले होते. मात्र तिचे लग्नापूर्वीच तरडोली (ता. बारामती) गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते.

ही माहिती तिने लग्न करताना तिच्या पतीपासून लपवून ठेवली. त्यानंतर ती 11 जुलै रोजी पतीच्या घरातून जवळपास दीड लाख रुपये किंमतीचे दागिने घेऊन पसार झाली. त्यामुळे तिच्या पतीने याबाबत पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यावरून महिला बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांनी घेतली. मात्र संबंधित मुलीने तिच्या प्रियकरासोबत आळंदी येथे जाऊन 17 जुलैला लग्न केले.

विशेष म्हणजे आळंदी येथील मंगल कार्यालयात वैदिक पद्धतीने लग्न करताना तिने अविवाहित असल्याचेही लिहून दिले आहे. हा सर्व प्रकार तिच्या पहिल्या पतीला समजल्यानंतर त्याला त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यावरून त्याने पत्नीसह तिचा प्रियकर या दोघांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. एम. बडे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com