ब्राम्हणीत अमावस्येच्या दिवशी आढळला उतारा

ब्राम्हणीत अमावस्येच्या दिवशी आढळला उतारा

उंबरे |वार्ताहर| Umbare

सर्वपित्री अमावस्येचा कुमुहूर्त साधून कोण्या अज्ञाताने रात्रीच्या वेळी उतारा तयार करून तो ब्राम्हणी-वांबोरी फाटा-शिंगणापूर रस्त्यावर टाकल्याने ब्राम्हणी परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. अमावस्येचा रात्री तीन रस्त्यावर हा तोडगा टाकण्यात आल्याने हा काही जादूटोण्याचा प्रकार आहे की काय? असा संभ्रम निर्माण झाला आहे.

यापूर्वीही वांबोरी येथील भरपेठेत असाच उतारा अमावस्येच्या दिवशीच टाकण्यात आल्याने या उतार्‍याचे गौडबंगाल काय? त्याचे कोडे अद्यापही गुलदस्त्यातच राहिले असून आता पुन्हा हा उतारा दिसल्याने ही करणी की भानामती? यावर भीतीदायक वातावरण निर्माण झाले असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह पोलीस प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्याची मागणी होत आहे. मंगळवारी रात्री सर्वपित्री अमावस्या होती. याच रात्री हा उतारा आढळून आला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नरबळीच्या घटना घडत आहेत.

तर काही गावांत गुप्तधनासाठी असे अघोरी प्रयोग काही कथित मांत्रिकांकडून होत आहेत. त्यामुळे हा उतारा आढळून आल्याने त्यामागे काय कारण असावे? असा सवाल होत आहे. या तीन रस्त्यावरील सीसीटीव्ही तपासून उतारा टाकणार्‍यांचा शोध लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.