ब्राम्हणीतील ते ‘तीन’ सावकार पसार

राहुरी पोलिसांचे दुर्लक्ष || शेतकरी संतप्त
ब्राम्हणीतील ते ‘तीन’ सावकार पसार

उंबरे |वार्ताहर| Umbare

खासगी सावकाराच्या सततच्या तगाद्यामुळे राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील शेतकरी जालिंदर ठकाजी वने यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि ते राहुरी पोलीस ठाण्यात संबंधित साव कारांवर गुन्हा दाखल करणार असल्याची कुणकुण लागताच ब्राम्हणी येथील ते तीन सावकार बुधवारी रात्रीच पसार झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

दरम्यान, खासगी सावकारांच्या या सततच्या मानसिक छळामुळे हवालदिल झालेल्या वने यांनी पुन्हा दुसर्‍यांदा आत्महत्येचा इशारा दिल्यानंतर सावकारांनी रातोरात पलायन केल्याने आता ते सावकार कोण? याबाबत चौकशी करून त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

राहुरी तालुक्यात पोलिसांच्या छुप्या आशिर्वादामुळे खासगी सावकारीला उधाण आले आहे. काही वर्षापूर्वी वने यांनी त्या खासगी सावकारांकडून सुमारे 16 लाख रुपये अव्वाच्या सव्वा व्याजदराने कर्ज घेतले. वने यांनी व्याजासह प्रामाणिकपणे त्या रकमेची परतफेड करून सुमारे 20 लाखांहून अधिक रक्कम त्या खासगी सावकारांना दिली. मात्र, त्यांनी दमदाटी करून वने यांच्याकडे पुन्हा पैशाचा तगादा सुरू केल्याने वने यांनी पुन्हा आत्महत्या करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या घटनेकडे राहुरी पोलिसांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याने राहुरी तालुक्यातील शेतकरीही पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे संतप्त झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी त्या खासगी सावकारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी अन्य शेतकर्‍यांनी केली असून राहुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com