ब्राम्हणी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने 12 जनावरे दगावली

अजूनही काही जनावरे आजारी || पशुपालकांनी घेतली ना. विखे पाटील यांची भेट
ब्राम्हणी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने 12 जनावरे दगावली

उंबरे |वार्ताहर| Umbare

तालुक्यातील ब्राम्हणीतील मानमोडी परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने दगावणार्‍या जनावरांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून आतापर्यंत 12 जनावरे दगावली आहेत. रविवारी सोनई दौर्‍या दरम्यान पशुपालक शेतकर्‍यांनी एका कार्यक्रमात महसूल व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन सदर प्रकरणी निवेदनाद्वारे याबाबत माहिती दिली.

यापूर्वी लहान-मोठी सात जनावरे दगावली होती. तीन दिवसांत पुन्हा चार जनावरे दगावली आहेत. यामध्ये दोन गायी व दोन कालवडी आहेत. जनावरांच्या मृत्यूचा आकडा आता 12 इतका झाला आहे. दोन दिवसांत प्रदीप जामदार, महेश नगरे, परसराम नगरे, शिवाजी हापसे यांची जनावरे दगावली. काही गोठ्यातील गायी अद्याप आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पशुपालकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले असून आकडा आणखी वाढण्याची भीती कायम आहे.

सदर प्रकरणी जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन नुकसानग्रस्त पशुपालकांच्या गोठ्यांना भेट देऊन माहिती घेतली. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंभारे यांनी सकाळीच सर्व गोठ्यावर जाऊन शेतकर्‍यांशी संवाद साधून सदर प्रकारची माहिती घेऊन अधिकार्‍यांना लसीकरण व नुकसानग्रस्त जनावरांचे प्रस्ताव तयार करण्याबाबत सूचना केल्या. दरम्यान पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी नुकसानग्रस्त पशुपालकांच्या भेटीदरम्यान ना. विखे पाटील यांनी डॉ.सुनील तुंभारे व तहसीलदार एफ.आर शेख यांना सदर प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले.

यावेळी राहुरी कारखान्याचे चेअरमन नामदेवराव ढोकणे, भाजपा जिल्हा सरचिटणीस सुरेश बानकर, बाजार समितीचे संचालक महेंद्र तांबे, अर्जुनराव पानसंबळ, सुनील अडसुरे, जगन्नाथ चौधरी, ग्रा.पं सदस्य उमाकांत हापसे,गणेश हापसे, राहुल हापसे, साहेबराव चौधरी, राधेश्याम राजदेव आदींसह परिसरातील ग्रामस्थ, शेतकरी, पशुपालक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com