ब्राह्मणगाव व वारी वीज उपकेंद्राचा प्रश्न मार्गी

स्नेहलता कोल्हे
स्नेहलता कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या ब्राह्मणगाव येथे नवीन विद्युत उपकेंद्र उभारणीसाठी आणि वारी येथील विद्युत उपकेंद्राची क्षमता वाढविण्यासाठी ऊर्जा विभागाने कार्यारंभ आदेश जारी केला आहे. या दोन्ही विद्युत उपकेंद्राचे काम मार्गी लागल्यामुळे ब्राह्मणगाव, वारी आणि परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना भेडसावणारा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वारी येथील विद्युत उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरवर अतिरिक्त भार पडत असल्यामुळे या उपकेंद्रास जोडलेल्या गावांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो. त्यामुळे शेतकर्‍यांचे कृषिपंप आणि घरातील विद्युत उपकरणे व्यवस्थित चालत नाहीत. विजेअभावी अनेक गावांमध्ये अंधार होतो. घरगुती वीज ग्राहकांना व शेतकर्‍यांना व्यवस्थित विद्युत पुरवठा होत नसल्याने त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

केवळ वीज उपलब्ध नसल्याने शेतकर्‍यांना कृषिपंप बंद ठेवावे लागतात व पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वारी येथील विद्युत उपकेंद्राला जोडलेल्या अनेक गावातील त्रस्त शेतकरी व नागरिकांनी वारी येथील विद्युत उपकेंद्राची क्षमता 3 वरून 5 एमव्हीए इतकी वाढविण्याची मागणी केली होती.

रवंदे येथील विद्युत उपकेंद्राची क्षमता वाढविण्याची मागणी या उपकेंद्राशी जोडलेल्या गावांतील ग्रामस्थांनी केली होती. तसेच ब्राह्मणगाव, टाकळी व परिसरातील गावांना खिर्डी गणेश व कोपरगाव येथील विद्युत उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. पण कमी दाबाने होणार्‍या विद्युत पुरवठ्यामुळे ब्राह्मणगाव, टाकळी व परिसरातील शेतकर्‍यांचे कृषिपंप व घरातील लाईट व्यवस्थित चालत नाहीत. विजेविना कृषिपंप बंद राहत असल्याने शेतकर्‍यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

जनतेची व शेतकर्‍यांची अडचण लक्षात घेऊन स्नेहलता कोल्हे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महावितरण व महापारेषण कंपनीचे नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता, अहमदनगर विभागाचे अधीक्षक अभियंता, संगमनेरचे कार्यकारी अभियंता, कोपरगाव ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आदींना निवेदन देऊन वारी आणि रवंदे येथील विद्युत उपकेंद्राची क्षमता वाढविण्याची तसेच ब्राह्मणगाव व धामोरी येथे नवीन 33/11 के. व्ही. विद्युत उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी केली होती. स्नेहलताताई कोल्हे यांनी ब्राह्मणगाव व धामोरी येथे नवीन 33/11 के. व्ही. विद्युत उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी सन 2016 पासून राज्य सरकारकडे लावून धरली होती.

स्नेहलता कोल्हे यांच्या पाठपुराव्यानंतर वितरण कंपनीचे कोपरगाव ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी ब्राह्मणगाव येथे नवीन विद्युत उपकेंद्रासाठी पाहणी केली आणि फिजीबिलीटी रिपोर्ट तयार करून तांत्रिक अंदाजपत्रक फेब्रुवारी 2018 रोजी पुढील कार्यवाहीसाठी संगमनेरच्या कार्यकारी अभियंत्यांकडे सादर केला होता. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे व संगमनेरचे कार्यकारी अभियंता गोसावी यांना पत्र पाठवून ब्राह्मणगावच्या नवीन विद्युत उपकेंद्राचे काम त्वरित सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर हे काम रखडले होते.

नंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर सौ. कोल्हे यांनी या कामासाठी पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेऊन ऊर्जा विभागाने ब्राह्मणगाव येथे नवीन 33/11 के. व्ही. विद्युत उपकेंद्र उभारणीसाठी 4 कोटी 85 लाख रुपये निधी मंजूर केला असून या कामाचा कार्यारंभ आदेशही काढला आहे.

या नवीन विद्युत उपकेंद्राच्या निर्मितीमुळे ब्राह्मणगाव व परिसरातील नागरिकांची व शेतकर्‍यांची विजेची समस्या कायमस्वरूपी दूर होणार आहे. शिवाय चासनळी, रवंदे या वीज उपकेंद्रावर पडणारा विजेचा भार मोठ्या प्रमाणात कमी होऊन या वीज उपकेंद्रांतर्गत येणार्‍या गावांना पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होणार आहे.

तसेच ऊर्जा विभागाने वारी येथील विद्युत उपकेंद्राच्या क्षमता वाढीसाठी 60 लाख रुपये निधी मंजूर केला असून या निधीतून वारी विद्युत उपकेंद्राची क्षमता 5 एमव्हीए करण्यात येणार आहे. या कामाची वर्क ऑर्डरदेखील काढण्यात आली असून हे काम पूर्ण झाल्यानंतर वारी येथील विद्युत उपकेंद्रांतर्गत येणार्‍या सर्व गावांतील घरगुती व कृषिपंपांचा वापर करणार्‍या वीज ग्राहकांना पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com