अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडात न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी फिरोज शेख व ज्ञानेश्वर शिंदे यांना

13 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असून यावर आज सुनावणी होणार आहे.

जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. यातील आरोपी सागर भिंगारदिवे, आदित्य चोळके व ऋषिकेश पवार हे पोलीस कोठडीत आहेत.

आरोपी फिरोज शेख व ज्ञानेश्वर शिंदे यांना अटक केल्यानंतर सुरूवातीला न्यायालयाने त्यांना 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. 7 डिसेंबरला त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी शेख व शिंदे यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती.

यावेळी त्यांना न्यायालयाने चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. गुरूवारी त्यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पारनेर न्यायालयात हजर केले.

उपअधीक्षक पाटील यांनी आरोपी शेख व शिंदे यांना तपासकामी पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी न्यायालयासमोर केली असता न्यायालयाने पाटील यांचे विनंती मान्य करत शेख व शिंदे यांना 13 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जरे यांची हत्या बोठे याने सुपारी देऊन घडून आणली असल्याचे तपासात पुढे आले आहे. बोठे पसार असून त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.

न्यायालयाने सरकारी वकील व पोलिसांना म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपींकडून तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जरे यांनी बोठे याच्या विरोधात यापूर्वी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. तसेच त्यांनी बोठे याच्या विरोधात चार पानी पत्र लिहून ठेवले असल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी ते पत्र जप्त केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.