अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील सूत्रधार बाळ बोठे याचा शस्त्र परवाना रद्द करण्याची कार्यवाही प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे.

बोठे याचा शस्त्र परवाना रद्द करण्याबाबतचे पत्र तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहे. अधीक्षक पाटील यावर निर्णय घेऊन शस्त्र परवाना रद्द करण्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पाच आरोपींना अटक केली आहे. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बोठे असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. बोठे पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी त्याच्या घराची तीन ते चार वेळेस झडती घेतली आहे. त्याच्या घरातून शस्त्रासह मोबाईल, पासपोर्ट व काही महत्त्वाची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. त्याचा शस्त्र परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी पोलिसांनी कार्यवाही सुरू केली आहे.

बोठे याचा शस्त्र परवाना यापूर्वी रद्द करण्यात आला होता. परंतु, त्यावेळी बोठे याने शस्त्राचा गैरवापर करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र सादर करून परवाना कायम केला होता. परंतु, आता बोठे याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने त्याचा शस्त्र परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. पोलीस अधीक्षक यांनी पाठविलेल्या अहवालावर जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेतल्यानंतर बोठे याचा शस्त्र परवाना रद्द होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.