
राहुरी (तालुका प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील धर्मांतर प्रकरणी राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची तडकाफडकी बदली केल्याचे समजताच संतप्त झालेल्या सर्वपक्षीय व सर्व संघटना, नागरिकांच्या वतीने आज शनिवार 24 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नगर-मनमाड महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, याप्रकरणी विधानभवनात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी प्रताप दराडे यांची काल तडकाफडकी अहमदनगर येथील मुख्यालयात बदली करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ काल दुपारी चार वाजेच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे पिंटूनाना साळवे व सचिन साळवे यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात स्वतःच्या अंगावर पेट्रोल सदृश पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलीस ठाणे परिसरात धावपळ उडाली होती. पोलीसांनी वेळी हस्तक्षेप करून दोघांना ताब्यात घेतले.
राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी धर्मांतराचं एक प्रकरण घडले होते. मात्र, स्थानिक पोलिसांनी यात हलगर्जीपणा आणि दिरंगाई केल्याचं आरोप नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांमार्फत 15 दिवसांत चौकशी केली जाईल. तोपर्यंत राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची आजच नियंत्रण कक्षात बदली करण्यात येईल, असं प्रभारी गृहमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत जाहीर केले आहे. राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दराडे यांनी गुन्हेगारीवर वचक राखण्यात यश आले होते. राहुरीतल्या महाविद्यालयीन मुलींची जर कोणी छेड काढत असेल तर संबंधित मुलींनी पोलीस निरीक्षक दराडे यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पो. नि. दराडे केले होते.
पो. नि. दराडे यांनी यासाठी तयार केलेली चित्रफित समाज माध्यमावर प्रसारीत केली होती. त्या चित्रफितीला पसंती मिळाली होती. राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या अवैध धंद्यावरही पो . नि . दराडे यांची करडी नजर टाकत कारवाईचा धडका सुरू होता. तोच दराडे यांच्या अचानक तडकाफडकी बदलीची चर्चा येऊन धडकताच राहुरी तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. यामुळे आज सर्वपक्षीय राहुरीत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
राहुरीचे पोलिस निरीक्षक दराडे यांनी दहा महिन्यांच्या कालावधीत चांगले काम केले. राहुरीची गुन्हेगारी आटोक्यात आणली. इतरांनी आमच्या तालुक्यात आ.राम सातपुते यांनी सुपारी घेऊन नाक खुपसु नये. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची राहुरीतून बदली केली तर येणार्या काळात उग्र स्वरूपाचे आंदोलन हाती घेणार आहे.
पै.रावसाहेब खेवरे, शिवसेना जिल्हाप्रमुख
राहुरीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पो. नि. दराडे यांचे महत्त्वाची भूमिका आहे. जर असे घडत असेल तर यामुळे राहुरी तालुका बदनाम होत आहे. कधीही चुकीचे काम व गुन्हे दाखल केले नाही. काही समाजात वाद निर्माण करणार्यांकडुन पोलिस अधिकार्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणतात. यामुळे राजकीय बळ वापरुन कारवाई करुन त्रास देण्याचे काम केले आहे.
सुरेंद्र थोरात, आरपीआय जिल्हा अध्यक्ष