
घारगाव |वार्ताहर| Ghargav
ग्रामपंचायतीचा कारभार मनमानी पद्धतीने चालू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत 14 व 15 व्या वित्त आयोगातून करण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या बाबतीत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांना समाधानकारक उत्तरे देता आले नसल्याने बोटा (ता.संगमनेर) येथे मंगळवारी (दि.29) आयोजित ग्रामसभेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली.
ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या प्रांगणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सोनाली शेळके होत्या. सभेचे कामकाज ग्रामविकास अधिकारी संजय कोल्हे यांनी पाहिले. ग्रामपंचायत 14 व 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत झालेल्या विकास कामांसंदर्भात व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. आगामी होणार्या विविध विकास कामांवर साधक-बाधक चर्चा करण्यात आली.
केळेवाडी येथे चिमुकल्यांसाठी शासकीय जागेत अंगणवाडी बांधण्यास अडचणी येतात असे सांगितले जाते मात्र, बोटा स्मशानभूमीत मुक्त महाराष्ट्र शासन जमिनीत फक्त दोन भिंती बांधण्यास 3 लाख 50 हजार खर्च करण्यात येतो. स्मशानभूमीत संबंधित विभागाची परवानगी नसताना खर्च केला जातो. मग केळेवाडीला का टाळाटाळ करता, तुम्हाला फक्त स्वहितासाठीच बांधकाम करण्यात जास्त इंटरेस्ट आहे का? असा सवाल ग्रामस्थांनी केला. यावेळी एकच गोंधळ उडाला. दरम्यान, परवानगी नसताना स्मशानभूमीत खर्च केल्याचे ग्रामसेवकांनी मान्य करत चुकीचा निधी खर्च झाल्याचा ठराव ग्रामस्थांनी घेण्यास भाग पाडले. दलीत वस्ती योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या गटार योजना पूर्ण असल्याचे दाखवून ठेकेदाराला पैसे दिले. मात्र, योजना अपूर्ण असल्याने ग्रामस्थांनी आवाज उठविला.
ग्रामपंचायत कार्यालयालगत असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीत असलेल्या प्रयोगशाळेला ग्रामपंचायत कार्यालयाबाजूने संबंधित विभागाची परवानगी न घेता माजी पंचायत समिती सदस्य संतोष शेळके आणि गटविकास अधिकारी अनिल नागणे यांचे फोनवरून झालेल्या संभाषणातून भिंत तोडून दरवाजा काढण्यात आला. त्यामधील प्रयोग शाळेचे साहित्य पोत्यात भरून ठेवले. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी ग्रामसभेत याबाबत माहिती दिल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. पुन्हा ही रूम प्रयोगशाळेला देण्याचे ठरले. हा दरवाजा ठेकेदाराने स्वखर्चाने दिल्याचे सरपंच शेळके म्हणाल्या.
अशा विविध प्रश्नांवर ग्रामसभेत गोंधळ निर्माण झाला. ग्रामसभांचे व्हिडीओ-ऑडीओ रेकॉर्डिंग घेण्यात यावे असे शासनाचे आदेश असतानाही रेकॉर्डिंग न केल्याने ग्रामसेवकांनी हलगर्जीपणा केल्याचा ठराव घेण्यात आला. घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची ग्रामस्थांना ग्रामपंचायतीकडून नोटिसा न देता थेट कोर्टातून नोटिसा दिल्या जातात. ते बंद व्हावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात काहीही माहिती नसल्याचे ग्रामसेवक कोल्हे यांनी ग्रामसभेत सांगितले. या व्यतिरिक्त अपूर्ण असलेल्या विविध कामांवर चर्चा करण्यात आली.
कृषी सहाय्यक बदलीचा ठराव
कृषी सहायक शारु जाधव या नेहमी गैरहजर असल्याने अनेक प्रश्नांची त्यांना ग्रामसभेत समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्या संगमनेर वरून काम पाहतात. प्रत्यक्ष शेतावर न जाता त्यांनी मागील वर्षांचे पंचनामे पाहून पुढील नुकसानीचे पंचनामे केले. बियाणे आणण्यासाठी घारगाव येथे 8 ते 10 किमीवरून शेतकर्यांना बोलावले. शासनाकडून येणारे बी बियाणे व औषधे हे ग्रामपंचायतीकडे गाळे शिल्लक असतानाही तीन ते चार किलोमीटर वर खाजगी लोकांकडे ठेवण्यात आले. असा ठपका ठेऊन त्यांच्या बदलीचा ठराव घेण्यात आला.
सरपंच सोनाली शेळके यांचे पती माजी पंचायत समिती सदस्य संतोष शेळके हेच ग्रामपंचायतीचा कारभार बघतात असा आरोप ग्रामस्थांनी वारंवार केला. याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे ग्रामस्थांनी लेखी तक्रार केली आहे. या कारणाने ग्रामसभा वादळी होईल याचा अंदाज घेऊन माजी पंचायत समिती सदस्य शेळके हे गावात उपस्थित असतनाही त्यांनी ग्रामसभेत येण्याचे टाळले.