बोटा येथील जुगार अड्ड्यावर नगर पोलिसांचा छापा

पुणे-नगर जिल्ह्यातील प्रतिष्ठीत 11 जुगारी ताब्यात
बोटा येथील जुगार अड्ड्यावर नगर पोलिसांचा छापा

घारगाव |वार्ताहर| Ghargav

संगमनेर तालुक्यातील बोटा शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तब्बल 1 लाख 79 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची घटना बुधवार (27 एप्रिल) दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. अकार जुगार्‍यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जुगार्‍यांमध्ये संगमनेर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील प्रतिष्ठीतांचा समावेश आहे.

बोटा शिवारातील पिराच्या ओढ्या कडेला जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती नगरच्या गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त खबर्‍यामार्फत मिळाली. पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे ओढा गाठला. तेथे अकरा जुगारी गोलाकार बसून पत्ते खेळताना आढळून आले. पोलिसांनी छापा टाकत तेथून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य ताब्यात घेतले. एकूण 1 लाख 79 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. दैनिक सार्वमतने बुधवारी याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करताच कारवाई झाल्याने नागरिकांनी दै. सार्वमतचे आभार मानले आहेत.

आत्माराम किसन सुकाळे (वय 54, रा. डिंगोरे, ता. जुन्नर, जिल्हा पुणे), विश्वनाथ बबन कावडे (वय 43, रा. बेल्हे ता. जुन्नर, जिल्हा पुणे), नामदेव काळूराम तळपे (वय 32, रा. आळे ता. जुन्नर, जिल्हा पुणे), मारुती बबन गुंजाळ (वय 42, रा. आळे ता. जुन्नर, जिल्हा पुणे), मिनिनाथ शशीकांत घाडगे (वय 38, रा. कांदळी ता. जुन्नर, जिल्हा पुणे), रोहित किरण शहा (वय 38, रा. ओतूर ता. जुन्नर, जिल्हा पुणे), सुनील गेनुभाऊ कुर्‍हाडे (वय 48, रा. आळेफाटा ता. जुन्नर, जिल्हा पुणे), दत्तात्रय सदाशिव फापाळे (वय 32, रा. जाचकवाडी ता. अकोले, जिल्हा अहमदनगर), सय्यद नजरअली असगर (वय 48, रा. मंचर ता. आंबेगाव, जिल्हा पुणे), जितेंद्र बबन घाडगे (वय 36, रा. पिंपळवाडी ता. जुन्नर, जिल्हा पुणे), सुभाष ज्ञानदेव मुसळे (वय 40, रा. बोटा ता. संगमनेर, जिल्हा अहमदनगर) अशी जुगारी आरोपींची नावे आहेत.

घारगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी नगरच्या गुन्हे शाखेच्या लक्ष्मण चिंधू खोकले यांच्या फिर्यादीवरून अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना 418 अ प्रमाणे नोटीस दिली आहे. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलीस नाईक राहुल सोळुंके, पोलीस हवालदार जालिंदर माने, रणजीत जाधव, योगेश सातपुते, बबन बेरड यांचा समावेश होता.

दावा ठरला फोल...

पुणे ग्रामीण पोलिसांच्या कारवाईचा जोर पाहून पुणे जिल्ह्यातील जुगार अड्डा चालकांनी पुणे-अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दी नजीकच्या संगमनेर तालुक्याच्या बोटा परिसरात स्थानिकांना व्यावसायिक भागीदार करत जुगाराचे अड्डे थाटले. याबाबत बुधवारी दै. सार्वमतने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्थानिक पोलिसांना जुगार अड्ड्याबाबत विचारणा केली मात्र त्यांनी अड्डे बंद असल्याचा दावा केला. मात्र नगर स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी केलेल्या कारवाईने स्थानिक पोलिसांचा दावा फोल ठरला आहे.

Related Stories

No stories found.