गुंजाळे घाटात मानवाच्या हाडांचा सांगाडा सापडला

घातपात की जादूटोणा? हाडे तपासणीला पाठविले
गुंजाळे घाटात मानवाच्या हाडांचा सांगाडा सापडला

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी नेवासा आणि नगर तालुक्याच्या सीमेवरील गुंजाळे परिसरात एका मानवी जातीची कवटीसह हाडे मिळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घातपात करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने गोणीत भरून ही हाडे येथे आणली आहे की, जादूटोणा? याबाबत नागरिकांमधून अनेक तर्क वितर्क लढविले जात आहेत.

या सर्व परिस्थितीत दरम्यान मंगळवार दि. 24 मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास गुंजाळे घाट परिसरातून जाणार्‍या काही नागरिकांनी घाटातील पाण्याच्या टाकीच्या डोंगराळ भागात रस्त्याच्या कडेला दगडामध्ये मानवी हाडे त्यात डोक्याची कवटी, स्क्रू लावलेले मांडीचे हाड तसेच इतरही मानवी शरीरातील हाडे आढळून आल्यामुळे या घटनेची वांबोरी पोलीस दूरक्षेत्र येथे फोन करून खबर देण्यात आली. त्यानंतर राहुरीचा पोलीस फौजफाटा गुंजाळे घाटामध्ये दाखल होऊन परिसराचा पंचनामा करून आणखी काही धागेदोरे हाती लागतात का? याबाबत कसून तपासणी केली.

हाडांचा पंचनामा करून ते ताब्यात घेऊन वांबोरी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून पुढील फॉरेन्सिक तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

घातपात घडवून आणून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हाडांचा सांगाडा परिसरात आणून टाकले असावेत, अशी चर्चा होत आहे. या हाडांच्या सांगड्यापासून त्या व्यक्तीचा शोध लावणे तसेच त्याची हत्या झाली असल्यास त्या आरोपीला शोधून त्याला पकडण्यासाठी राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांची मोठी कसब लागणार आहे. या घटनेच्या तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

राहुरी तालुक्यासह नेवासा व नगर तालुक्याच्या सीमेलगत तसेच नगर-औरंगाबाद महामार्गापासून दोनच किमीवर असलेले गुंजाळे गाव कायमच गुन्हेगारांच्या कारवायांमुळे चर्चेत राहिले आहे. मागिल काही महिन्यांपूर्वीच गावठी कट्टा हाताळताना एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्याचबरोबर नगर-औरंगाबाद महामार्गावर पांढरीपुल परिसरामध्ये अवैध व्यावसायिकांचा या परिसरात अनेकवेळा सर्रास वावर दिसून येतो. तसेच हा परिसर निर्मनुष्य व डोंगर घाटमय असल्याने अनेकवेळा रात्री-अपरात्री वाटसरूंना लुटीचे अनेक प्रकार येथे घडतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com