बोल्हेगावात तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

आर्थिक व्यवहारातून छळ || एकावर गुन्हा
बोल्हेगावात तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पैशाच्या व्यवहारातून तरुणाला त्रास दिल्याने त्याने आत्महत्या केल्याची घटना बोल्हेगाव उपनगरात बुधवारी (दि. 11) रात्री घडली. संजय साहेबराव भवर (वय 40 मूळ रा. कोहिम ता. आष्टी, जि. बीड, हल्ली रा. शनिधाम, साईनगर, बोल्हेगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. सदरचा प्रकार गुरूवारी (दि. 12) सकाळी उघडकीस आला.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सुरूवातीला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मयताकडे आढळलेल्या चिठ्ठीतून आत्महत्येचे कारण समोर आले आहे. मयत संजय भवर यांचा भाऊ रमेश साहेबराव भवर (वय 45, रा.कोहिम, ता. आष्टी, जि. बीड) यांनी गुरूवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चंद्रकांत पाबले (पूर्ण नाव माहिती नाही, रा.केडगाव)याच्याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय भवर व चंद्रकांत पाबले हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांच्यात चार लाख 90 हजार रुपयांचा आर्थिक व्यवहार झालेला होता. या व्यवहारातून चंद्रकांत पाबले याने संजय भवर यांना मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून संजय यांनी बुधवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

संजय यांनी आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी नातेवाईकांच्या लक्षात आली. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहा.निरीक्षक नितीन रणदिवे यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com