
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरातील बोल्हेगाव उपनगरात जमावाच्या मारहाणीत राजेश काशिनाथ सोनार उर्फ सोनार बाबा (वय 55 मूळ रा. भेंडा ता. नेवासा) यांचा मृत्यू झाला होता. या गुन्ह्यामध्ये लष्करात असलेल्या एका जवानाचा मारहाणीत सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या अटकेसाठी तोफखाना पोलिसांकडून लष्कराकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
एका चार वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याच्या संशयातून जमावाने सोमवारी रात्री राजेश सोनार यांना मारहाण केली होती. यासंदर्भात काही व्हिडिओ तोफखाना पोलिसांना मिळाले आहेत. या व्हिडीओ मधील संशयित म्हणून आरोपी राजेंद्र रामकृष्ण नायर (वय 36 रा. वाकळे वस्ती, बोल्हेगाव), अझर शब्बीर शेख (वय 19, रा. गांधीनगर), सिकंदर मेहमूद शहा (वय 19, रा. संभाजीनगर, बोल्हेगाव), सोमनाथ बापू गायकवाड (वय 38, रा. गांधीनगर, बोल्हेगाव) या चौघांना तोफखाना पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती.
न्यायालयाने या चौघांना या गुन्ह्याच्या तपासासाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. या आरोपींची पोलीस कोठडी सोमवारी संपली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी या गुन्ह्याचा तपास करत आहेत.