अहमदनगर (प्रतिनिधी) -

कर्ज प्रकरणात 22 कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज शनिवारी सकाळीच नगर शहरात छापेमारी करत संचालकांसह दोघांना अटक केली आहे. छापेमारीची खबर मिळताच अन्य संचालक अटकेच्या भितीने गायब झाले.

नवनीत सुरपुरिया, कर्जदार यज्ञेश चव्हाण अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नगर अर्बन बँकेच्या पिंपरी चिंचवड शाखेत 11 कोटी रूपयांची दोन बोगस कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली होती. जागेचे बनावट मुल्यांकन करत हे कर्ज उचलून बँकेची फसवणूक केल्याची तक्रार बँकेचे अधिकारी महादेव पंढरीनाथ साळवे यांनी पोलिसांत दिली होती. बँकेचे तत्कालीन संचालक, कर्ज उपसमितीचे सदस्य आणि कर्जदार, व्हॅल्युअर अशांचा आरोपींमध्ये समावेश होता. बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण (तिघेही रा. संभाजीनगर, पिंपरी चिंचवड), मंजूदेवी हरिमोहन प्रसाद (रा. शाहूनगर, पिंचरी चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, पिंपरी चिंचवड) आणि अभिजीत नाथा घुले (रा. बुरूडगाव रोड, नगर) यांचा आरोपींमध्ये समावेश होता.

पिंपरी चिंचवडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्या पथकाने आज शनिवारी सकाळीच नगरमध्ये छापेमारी केली. त्यात संचालक सुरपुरिया पोलिसांच्या हाती लागले. इतर संचालकांना छापेमारीची खबर मिळाल्याने ते गायब झाले. अटकेच्या भितीने अनेकांनी मोबाईल बंद करून ठेवले होते.

कृष्णप्रकाश यांच्या पथकाची कारवाई

तत्कालीन चेअरमन माजी खासदार दिलीप गांधी यांच्या कार्यकाळातही हे कर्ज प्रकरणं आहेत. गुन्ह्यात पोलिसांना गांधी यांनाही अटक करायची होती. पोलीस पथक गांधी यांच्या घरी गेले, पण ते तेथे मिळून आले नाही. त्यामुळे पथक माघारी फिरले. इतर संचालकांच्या घरीही शोधमोहीम राबविली गेली, पण कोणीच मिळून आले नाही. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या पथकाने नगरमध्ये छापेमारी करत केलेल्या कारवाईने नगर शहरात खळबळ उडाली आहे.