
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसतानाही रूईछत्तीशी (ता. नगर) गावात दावाखाना चालविणार्या ज्ञानदेव निवृत्ती पवार (वय 63 रा. साकत ता. नगर, हल्ली रा. रूईछत्तीशी) याच्यासह त्याला प्रोत्साहन देणार्या डॉ. दिलीप बाबासाहेब भोस (रा. घोगरगाव ता. श्रीगोंदा) यांच्याविरूध्द भादंवि कलम 419, 420, इंडियन मेडिकल अॅक्ट, महाराष्ट्र मेडिकल अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रूईछत्तीशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लहु विनायक चव्हाण (वय 27 रा. रूईछत्तीशी, मूळ रा. हनुमाननगर, निपाणी टाकळी ता. माजलगाव, जि. बीड) यांनी फिर्याद दिली आहे. ज्ञानदेव पवार याला अटक केली असून त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. नगर तालुका आरोग्य विभाग व नगर तालुका पोलिसांनी मंगळवारी टाकलेल्या छाप्यात बोगस डॉक्टरचे कारनामे समोर आले होते.
ज्ञानदेव पवार हा वैद्यकीय व्यावसायिक नसतानाही रूईछत्तीशी गावामध्ये दावाखाना चालवित होता. तो डॉ. भोस याचे नावे हा दावाखाना चालवून रुग्णांवर उपचार करत होता. त्याच्या दावाखान्यात अॅलोपॅथी औषधांचा साठा मिळून आला आहे. दरम्यान यापूर्वी देखील त्याने अशा पध्दतीने दावाखाना चालविण्याचा प्रकार सन 2011 मध्ये उघडकीस आला होता. त्यावेळी त्याच्याविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता पुन्हा त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. दिलीप भोस याच्या नावे पवार हा दावाखाना चालवित असल्याचे समोर आले आहे. डॉ. भोस याने देखील पवार याला दावाखाना चालवण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे, यावरून डॉ. भोस विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण अधिक तपास करीत आहेत.