कर्जत जवळ बिबट्याचा मृतदेह आढळला

कर्जत जवळ बिबट्याचा मृतदेह आढळला

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

कर्जत तालुक्यातील रजपूतवाडी शिवारातील बुवासाहेब मळा याठिकाणी आज बिबट्याचा मृतदेह आढळला. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील रजपूतवाडी शिवारातील व बुवासाहेब मळा परिसरात परशुराम परदेशी हा शेतकरी शेतामध्ये जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेले असताना त्याना दुर्गंधीयुक्त वास आला. कशाचा वास येत आहे, कोणते जनावर मेले की काय हे पाहण्यासाठी तो त्या दिशेने गेला असता समोर दिसलेले दृश्य पाहून परशुराम परदेशी हादरून गेला. उसाच्या शेतात त्यांना बिबट्या दिसला.

मनामध्ये भीती होती तरीही धाडस करून परशुराम यांनी पुढे जाऊन पाहिले असता तो बिबट्या मेलेला असल्याचे लक्षात आले. आणि त्याचीच दुर्गंधी पसरली होती. त्यांनी तात्काळ आसपासच्या शेतकऱ्यांना ही माहिती सांगितली त्यानंतर मेलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी देखील आसपासच्या परिसरातून शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. यानंतर याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या परिसरामध्ये बिबट्याचा वावर यापूर्वी होता हे आता स्पष्ट झाले असून याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर समजून येईल. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी मोहनराव शेळके हे घटनास्थळी पथकासह पोहचले.

यानंतर त्यांनी आसपासच्या परिसराची देखील पाहणी केली. शेळके यांनी सांगितले की, मरण पावलेला बिबट्या याचे वय अंदाजे चार वर्ष असावे, त्याच्या शरीराची पूर्ण वाढ झालेली दिसून येते त्याच्या मृत्यूचे कारण नैसर्गिक आहे. त्याला कोठेही जखम झालेली नाही यामुळे त्याला कोणी मारण्याची शक्यता नाही. साधारण तीन ते चार दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला असावा त्याचा मृतदेह पूर्णपणे सडलेला आहे. या परिसरातील शेतकरी नागरिक यांना बोलावून या ठिकाणी पंचनामा केलेला आहे. आणि या ठिकाणी या बिबट्याचा अंत्यविधी करण्यात येणार आहे अशी माहिती शेळके यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com