लाच स्वीकारताना समनापूरचा मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

लाच स्वीकारताना समनापूरचा मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

संगमनेर | शहर प्रतिनिधी

जमिनीची खरेदी नोंद रद्द करून घेण्यासाठी आठ हजार रुपयाची लाच घेताना समनापुर येथील मंडळ अधिकारी बाळासाहेब कचरु जाधव यांच्यासह तलाठी कार्यालयातील खासगी मदतनीस मनोज मंडलिक यांना अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

याबाबत समजलेली माहिती अशी की, तालुक्यातील पोखरी हवेली येथील एका शेतकर्‍याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे समनापूरचे मंडळ अधिकारी बाळासाहेब जाधव यांच्याबाबत तक्रार केली होती. तक्रारदार यांनी त्यांचे चुलत्यास शेतजमीन विक्री केली होती. त्याचे विक्री दस्त मध्ये चुकीचे क्षेत्र नमुद झाले होते व सदर दस्त आधारे शेतीचा फेर नोंद झाला होता व तक्रारदार यांनी सदर फेर रद्द करण्या करिता अर्ज दिला होता. यातील लोकसेवक यांचे कडून खरेदीचा फेर मंजूर होणे प्रलंबित होते.

खरेदीचा फेर मंजूर करते वेळेस रद्द लेखा प्रमाणे खरेदी नोंद रद्द करण्याचे काम करून देण्यासाठी मंडळ अधिकारी यांनी खाजगी इसम यांचे मध्यस्थीने तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी करुन तडजोड अंती आठ हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले. सदर लाचेची रक्कम काल सकाळी समनापूर मंडळ अधिकारी कार्यालय येथे स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले व खाजगी मदतनीस यांनाही ताब्यात घेण्यात आले.

अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकाने मंडळ अधिकारी बाळासाहेब कचरु जाधव (वय 45) व तलाठी कार्यालयातील खाजगी सचिव मनोज ज्ञानेश्वर मंडलिक (वय 46, रा. माळीवाडा, संगमनेर) यांना ताब्यात घेतले.

या कारवाईत पोलीस निरीक्षक श्याम पवरे, दिपक करांडे, पोलीस नाईक चौधरी, पोलीस शिपाई रविंद्र निमसे, वैभव पांढरे, महिला पोलिस अंमलदार संध्या म्हस्के, चालक पोलीस हवालदार हरुन शेख, पोलीस नाईक राहुल डोळसे हे सहभागी झाले होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com