शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

बोधेगाव (प्रतिनिधी)

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील नुकसान झालेल्या पिकाचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी बालमटाकळी येथे शेवगाव- गेवराई राज्यमार्गावर संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन दोन तासांनी मागे घेण्यात आले.

शेवगाव तालुक्यात पूर्व भागातील बालमटाकळी -बोधेगाव परिसरात गेल्या दीड महिन्याभरात सरासरी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने अतिवृष्टीमुळे शेत जमिनीत पाणी साचल्याने शेतातील खरीप हंगामातील कापूस, तुर, मुग, उडीद, सोयाबीन, बाजरी, आदी उभी पिके सडून जाऊन शेतकऱ्यांचे अतोनात मोठे नुकसान झाले आहे, काहींच्या विहिरी ढासळल्या गेल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या तोंडातील घास अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला आहे.

नुकसानग्रस्त पिकाचे सरसकट पंचनामे करून मराठवाड्याच्या धर्तीवर हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, ई-पीक पाहणी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीची ठरत आहे त्यामध्ये सवलत द्यावी, शेवगाव -गेवराई राज्यमार्ग, बालमटाकळी- कांबी जोडणाऱ्या रस्त्यावरील पूल जोरदार अतिवृष्टीमुळे पाण्याने वाहून गेले आहे तसेच परिसरातील प्रमुख रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यावरून प्रवास करणे जिकरीचे होऊन अपघाताला निमंत्रण मिळत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे सदर खड्डे तातडीने दुरुस्त करण्यात याव्यात अश्या प्रमुख मागण्या संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी केल्या.

बोधेगावचे मंडलाधिकारी भाऊसाहेब खुडे, तलाठी बाबासाहेब अंधारे यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे अश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी बोधेगाव पोलीस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान बडधे, मरकड, ढाकणे, गायकवाड यांनी चोक बंदोबस्त ठेवला. यावेळी राज्यमार्गावर वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.

या आंदोलनात बाजार समितीचे संचालक रामनाथ राजपुरे, बप्पासाहेब पारनेरे, राजेंद्र ढमढेरे, उपसरपंच तुषार वैद्य, मोहनराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, चंद्रकांत गरड, विक्रम बारवकर, नामदेव कसाळ, हरी फाटे,संजय वडते, हरीचंद्र घाडगे, यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

Related Stories

No stories found.