‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाका

महापौर बाबासाहेब वाकळे । विकासकामांचा आढावा
‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाका

अहमदनगर (प्रतिनिधी) -

कमी दराच्या निविदा भरून कामे न करणार्‍या ठेकेदारांना नोटीसा द्या. नोटीस देऊनही ते ऐकत नसतील तर त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाका असे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिले.

महापालिकेच्या बांधकाम विभागातील कामांचा आढावा महापौर वाकळे यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. उपायुक्त डॉ. प्रदिप पठारे, मुख्यलेखाअधिकारी प्रविण मानकर, शहर अभियंता सुरेश इथापे, सहाय्यक आयुक्त लांडगे, सिनारे, राऊत, अभियंता मनोज पारखे, निंबाळकर, उदय कराळे, निखील वारे, विलास ताठे, सतिष शिंदे, संजय ढोणे यावेळी उपस्थित होते.

कोवीडच्या प्रादुर्भावामुळे अंदाजपत्रक मंजूरीला उशिर झाला. शहरातील आवश्यक असणार्‍या प्रभागामध्ये विकास कामे करण्याचे प्रस्ताव नगरसेवकांच्या मागणीनुसार सादर केलेले आहेत. मार्च 2021 अखेर विकास कामांचे प्रस्ताव मंजूर होवून विकास कामे पूर्ण करण्याच्या दृष्टिने कार्यवाही करणे गरजेचे आहे. परंतू बर्‍याच कामांच्या निविदा कमी दराने भरले जातात. अशी कामे संबंधीत ठेकेदार लवकर सुरू करित नाहीत. त्यामुळे नगरसेवकांनी सुचविलेल्या कामास विलंब होतो, परिणामी त्याभागातील नागरिक नगरसेवकांवर नाराज होतात. नगरसेवकांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते. कमी दराने निविदा भरणार्‍या ठेकेदारांना काम सुरू करण्यासाठी नोटीसा देण्याचे आदेश दिले. नोटीस देवूनही काम सुरू न केल्यास काळया यादीमध्ये टाकण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश महापौर वाकळे यांनी दिले.

शहर अभियंता इथापे म्हणाले यांनी या आर्थिक वर्षात मनपाच्या निधीतून काम प्रस्तावित करण्यात आलेली असून कामांना मंजूरीच्या दृष्टिने प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे सांगितले. प्रस्ताव मंजूर करून वर्क ऑर्डर देण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येत आहे. वर्क ऑर्डर झालेली कामे सुरू करण्यासंबंधी ठेकेदारांना सुचना दिलेल्या आहेत. प्रस्तावित कामे दर्जेदार करण्याच्या दृष्टिने संबंधीत ठेकेदार यांना सुचना दिलेल्या आहेत. काम सुरू असताना प्रत्यक्ष पाहणी करूनच पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याचे इथापे यांनी यावेळी सांगितले.

अर्धवटराव ठेकेदारांंना लगामासाठी नवी अट

कमी रकमेची निविदा भरून कामे न करणार्‍या ठेकेदारांना नोटीसा बजाविण्यात याव्यात तसेच यापुढील कामामध्ये निविदेमध्ये पूर्वीचे काम पूर्णत्वाचा दाखला आवश्यक असल्याबाबत अट टाकण्यात यावी, असे आदेश उपायुक्त प्रदीप पठारे यांनी बांधकाम विभागाला दिले. वर्क ऑर्डर देण्यात आलेली कामे तातडीने सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com