काळ्या बाजारात जाणारा 83 क्विंटल तांदूळ पकडला

एलसीबी, कोतवाली पोलिसांची मार्केटयार्डमध्ये कारवाई
काळ्या बाजारात जाणारा 83 क्विंटल तांदूळ पकडला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मार्केटयार्ड मधील हमाल पंचायतसमोर रेशनच्या तांदळाच्या अवैध साठा एका पिकअप मधून जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा व कोतवाली पोलिसांच्या पथकाने गुरूवारी संयुक्तपणे ही कारवाई केली. यात 83 क्विंटल तांदळासह सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुरूवारी सकाळी पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मार्केटयार्ड हमाल पंचायत समोरील बोथरा यांच्या गाळ्याजवळ एक पीकअप गाडी शासकिय योजनेतील रेशनचा तांदूळ घेऊन आल्याची माहिती मिळाली. त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह संयुक्त कारवाई करत सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला.

यावेळी मार्केटयार्ड येथे दीपक ताराचंद बोथरा (रा. माणिकनगर, बुरूडगाव रोड) यांच्या गाळ्यासमोर एका पिकअपमधून (एमएच 28 एबी 0449) काही कामगार गोणीमधील तांदूळ खाली करताना आढळून आले. तसेच सदर गाळ्यात काही रेशनच्या तांदळाची साठवणूक केल्याचे आढळून आले. पोलिसांनी पिकअप व रेशनचा तांदूळ असा दोन लाख 99 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सना चांद बेग (रा. भाळवणी, ता पारनेर) व दीपक ताराचंद बोथरा (वय 55, रा. माणिकनगर) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुध्द कोतवाली पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू कायदा कलम 1955 च्या कलम 3 व 7, भादंवि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलदार सुजय हिवाळे यांनी फिर्याद दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com