काळ्याबाजारात जाणारा रेशनचा 10 टन तांदूळ पकडला

एलसीबीची कारवाई || तिघांवर गुन्हा, दोघे नेवाशाचे
काळ्याबाजारात जाणारा रेशनचा 10 टन तांदूळ पकडला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

रेशनचा शासकीय स्वस्त धान्य वितरण योजनेतील तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणारा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडला. शनिवारी रात्री खोसपुरी (ता. नगर) शिवारात ही कारवाई केली. एक लाख 73 हजार 250 रुपये किंमतीचा 210 गोण्यांमधील 10 हजार 500 किलो तांदूळ, पाच लाख रुपये किंमतीचा ट्रक (एमएच 17 बीवाय 5960) असा एकूण सहा लाख 73 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अंमलदार सचिन आडबल यांच्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालक फारूक फकीर महंमद शेख (वय 30), ट्रक मालक कांतिलाल झुंबरलाल भंडारी (वय 54, दोघे रा. खरवंडी ता. नेवासा) व दुकानदार मुकेश बोरा (रा. वडुले वाघुली ता. शेवगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील ट्रक चालक शेख व मालक भंडारी यांना अटक करण्यात आली आहे. पांढरीपूल ते शेवगाव रोडवरून शेवगावकडून पांढरीपुलकडे एका ट्रकमधून रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.

त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलीस अंमलदार विजयकुमार वेठेकर, बापुसाहेब फोलाणे, शंकर चौधरी, लक्ष्मण खोकले, संतोष लोढे, जालिंदर माने, आडबल, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने शनिवारी रात्री सव्वा बारा वाजता पंचासमक्ष पांढरीपूल-शेवगाव रोडवरील खोसपुरी शिवारात सापळा लावला. मिळालेल्या माहितीनुसार शेवगावकडून पांढरीपूलकडे येणारा संशयीत ट्रक पोलिसांनी थांबविला.

पंचासमक्ष ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये 210 गोणी तांदूळ मिळून आला. पोलिसांनी ट्रक चालक शेख व मालक भंडारी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता तांदळाचे बिल त्यांच्याकडे मिळून आले नाही. ट्रकसह तांदूळ पोलिसांनी जप्त करत शेख व भंडारी यांना अटक केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कटके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बोराच्या दुकानातील माल

एलसीबी पथकाने संशयीत ट्रक ताब्यात घेतल्यानंतर त्याची पंचासमक्ष तपासणी केली. यामध्ये तांदूळ मिळून आला. ट्रकमधील फारूक फकीर शेख व कांतिलाल झुंबरलाल भंडारी यांच्याकडे तांदळाबाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी भंडारी याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की, मी ट्रकचा मालक असून तांदळाच्या गोण्या मुकेश बोरा (रा. वडुले वाघुली, ता. शेवगाव) याच्या दुकानातून भरलेला असून तो रेशनचा शासकीय स्वस्त धान्य वितरण योजनेतील तांदूळ असल्याची कबुली त्याने दिली. बोरा पसार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com