श्रीगोंदा तालुक्यात रेशन तांदळाचा काळाबाजार

सापळा रचून पोलिसांनी टेम्पो केला जप्त
श्रीगोंदा तालुक्यात रेशन तांदळाचा काळाबाजार

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक याठिकाणी बाजारात विक्री साठी घेऊन जाणारा रेशनच्या तांदळाचा आयशर टेम्पो श्रीगोंदा पोलिसांनी पहाटे सापळा रचून ताब्यात घेतला. पुढील कारवाई साठी पोलिसांनी तहसीलदार मिलिंद कुलथे यांचा अभिप्राय मागण्यासाठी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक याठिकाणी रेशनचा तांदूळ विक्रीसाठी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव सुद्रिक येथे सापळा लावण्यात आला होता. रात्री उशिरा रस्त्याने संशयास्पद पद्धतीने जाणारा आयशर टेम्पो (क्र.एम.एच 12 एच.डी 2727) थांबवत पाहणी केली असता टेम्पो मध्ये सुमारे 80 ते 85 पांढर्‍या गोण्यांमध्ये तांदूळ भरलेला दिसला. मात्र त्याचवेळी अंधाराचा फायदा घेत टेम्पो चालकाने उडी मारून तेथून धूम ठोकली.

चालक फरार झाल्याने पोलिसांनी तो टेम्पो पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणला. पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार मिलिंद कुलथे यांचा अभिप्राय मागण्यासाठी पत्रव्यवहार पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी केला आहे. याबाबत तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पोलिसांचे पत्र आल्याचे सांगत गुन्हा दाखल होणार असल्याचे सांगीतले. पुरवठा विभागाची अहमदनगर येथे बैठक असल्याने पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी नगर येथे होते. ते आल्यानंतर पाहणी करून पोलिसांना पुढील कारवाईसाठी अहवाल देणार असल्याचे कुलथे यांनी सांगितले.

... तर संपर्क साधा

शासनाने सर्वसामान्यांपर्यंत रेशनचे धान्य पोहचण्यासाठी उपायोजना राबवत आहे. पंरतु अशा पद्धतीने दुकानदार या धान्याचा काळाबाजार करत असतील. धान्य मिळत नसेल तसेच तालुक्यात जर कोणाच्या रेशनबाबत इतर काही तक्रारी असल्यास नागरिकांनी तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार कुलथे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com