डाव्यांनी काळा दिवस पाळून केला केंद्र सरकारचा निषेध

काळे झेंडे फडकवून मोदी चलेजावच्या दिल्या घोषणा
डाव्यांनी काळा दिवस पाळून केला केंद्र  सरकारचा निषेध

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला सहा महिने होत असताना, केंद्र सरकार मागण्या पूर्ण न करता आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा व आयटक कामगार संघटनेच्यावतीने काळा दिवस पाळण्यात आला.

बुरुडगाव रोड येथील भाकपच्या पक्ष कार्यालयासमोर केंद्र सरकारचा निषेध म्हणून काळा झेंडा फडकविण्यात आला. उपस्थित पदाधिकार्‍यांनी निदर्शने करून मोदी चले जावच्या घोषणा दिल्या. या आंदोलनात भाकपचे राज्य सहसचिव अ‍ॅड. कॉ. सुभाष लांडे, आयटकचे अ‍ॅड.कॉ. सुधीर टोकेकर, कामगार संघटना महासंघाचे बहिरनाथ वाकळे, सतीश पवार, तुषार सोनवणे, दीपक शिरसाठ आदी उपस्थित होते.

संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण भारतभर केंद्र सरकार विरोधात काळा दिवस पाळला जात आहे. 7 वर्षापूर्वी भाजप सरकार सत्तेवर येऊन 26 मे रोजी मोदी सरकारचा शपथविधी झाला होता. मोदी सरकारने शेतकरी, कामगार व जनविरोधी धोरणे राबविल्याचा आरोप करून काळा दिवस पाळला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या अनुषंगाने शहरात काळा दिवस पाळून केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.

अ‍ॅड. लांडे म्हणाले, शेतकरी व कामगारांच्या आंदोलनाला सहा महिने होत असताना देखील केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. सात वर्षांत मोदी प्रणित भाजप सरकारने शेतकरी, शेतमजूर, कामगारांना देशोधडीला लावले. भांडवलदारांच्या हिताचे कामगार व शेतकरी कायदे पारीत केले. खतांच्या किमती वाढवून पुन्हा कॉर्पोरेट कंपन्यांना 14 हजार कोटी रुपये अनुदान दिले. शेतकरी व कामगार विरोधी कायदे करण्याच्या मोदींच्या धोरणाविरोधात संपूर्ण देश पेटून उठला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

या आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारने त्वरीत शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत, एमएसपी लागू करावा, सर्व नागरिकांना केंद्र सरकारने तातडीने करोना लस नि:शुल्क उपलब्ध करून द्यावी, टाळेबंदीत रोजगार हिरावलेल्या कामगारांना साडेसात हजार रुपये महिना अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com