अकोले पंचायत समितीवर पिचड गटाचा झेंडा

सभापतिपदी उर्मिलाताई राऊत बिनविरोध
अकोले पंचायत समितीवर पिचड गटाचा झेंडा

अकोले | प्रतिनिधी | Akole

अकोले पंचायत समितीच्या सभापतिपदी भाजपच्या उर्मिलाताई राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पंचायत समितीवर माजी मंत्री मधुकरराव पिचड व वैभवराव पिचड यांचे वर्चस्व सिध्द झाले आहे.

सभापती दत्तात्रय बोर्‍हाडे यांच्या निधनानंतर रिक्त जागेवर निवडणूक घोषित झाली होती. निवडणूक अधिकारी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी ही निवड दुपारी 3 वाजता जाहीर केली. यावेळी भाजप कार्यालयात माजी आमदार वैभवराव पिचड, भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे,ज्येष्ठ नेते गिरजाजी जाधव, जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे, आदिवासी सेवक काशीनाथ साबळे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सभापती उर्मिलाताई राऊत, उपसभापती दत्तात्रय देशमुख, माजी सभापती रंजनताई मेंगाळ, सीताबाई गोंदके, माधवी जगधने, सारिका कडाळे, अलकाताई अवसरकर,गोरख पथवे हे आठ सदस्य भाजप कार्यालयात उपस्थित होते. 11 पैकी 8 सदस्य भाजपाकडे होते. संख्याबळ नसल्याने राष्ट्रवादी विरोधकांनी निवडणुकीकडे पाठ फिरवली.

यावेळी नवनिर्वाचित सभापती उर्मिलाताई राऊत म्हणाल्या, मधुकरराव पिचड व वैभवराव पिचड यांनी माझ्याकडे कोणतेही राजकीय वलय व वारसा नसताना माझ्यासारख्या सामान्य कुटुंंबातील महिलेस तालुक्यातील सर्वोच्च सभापती पद देऊन माझा नव्हे तर संपूर्ण समाजाचा सन्मान केला आहे. या पदाचा उपयोग मी समाजाच्या हितासाठी निश्चित करेल. नूतन सभापती राऊत यांना जिल्हा बँकेचे सीताराम गायकर, सीताराम भांगरे, गिरजाजी जाधव, जालिंदर वाकचौरे, काशीनाथ साबळे, रामनाथ भांगरे, सी. बी. भांगरे, सुरेश भांगरे, भाऊसाहेब वाकचौरे यांनी शुभेच्छा दिल्या.

माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले, एक डोळ्यात दुःख दत्तात्रय बोर्‍हाडे यांच्या निधनाचे व एका डोळ्यात शेतकरी महिलेला सभापती पद मिळाल्याचा आनंद आहे. उर्मिला राऊत यांची बिनविरोध निवड झाली असली तरी ते सदस्य सोबत होते. सर्वजण यापुढे एकत्र राहून तालुक्यातील आरोग्य व विकासाच्या कामात सतर्क राहून काम करावे. जिथे अडचण असेल, निधीची कमतरता असेल तिथे आम्ही तुमच्या पाठीशी राहूच. सूत्रसंचालन भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले. आभार यशवंत आभाळे यांनी मानले.

माझ्या स्वप्नांतही कधी वाटले नाही की, मी सभापती होईल. शिक्षण कमी, शेतमजुरी, तर कोणताही राजकीय वारसा नाही. घर आणि शेत हेच माझे विश्व. मात्र माजी मंत्री पिचड यांनी मला मुलगी समजून सभापतिपदाची संधी दिली. वैभव भाऊंनी मला साथ दिली. माझे दत्तात्रय हे भाऊ स्वर्गवासी झाले असले तरी त्यांनी दिलेली सामाजिक बांधिलकीची शिकवण विसरणार नाही. असे भावनिक उद्गार उर्मिलाताई राऊत यांनी काढले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com