दूधाला हमी भावासाठी संगमनेरात भाजपाच्यावतीने धरणे आंदोलन
सार्वमत

दूधाला हमी भावासाठी संगमनेरात भाजपाच्यावतीने धरणे आंदोलन

Nilesh Jadhav

संगमनेर | प्रतिनिधी | Sangmner

दूध उत्पादक शेतकर्‍यांना ठरवून दिलेला हमीभाव मिळत नाही, राज्यातील दूध संघांनी एकत्रितपणे येवून शेतकर्‍यांवर अन्याय सुरु केला आहे. राज्यातील दूध उत्पादकांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नसल्याने हे सरकार कुचकामी आणि शेतकरी विरोधी असल्याची टीका भारतीय जनता पक्षाच्यावतीने करण्यात आली. दूध उत्पादक शेतकर्‍यांवर अन्याय दूर न झाल्यास दिनांक 1 ऑगस्ट रोजी यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपस्थित आंदोलकांनी दिला.

दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या वतीने भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्यावतीने प्रांताधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने राज्यातील सर्व दूध संघांनी सरसकट 25 रुपये ठरवून दिलेल्या हमीभावाची अंमलबजावणी करावी. दूधाचा प्रतीलिटर दर 30 रुपये करावा. दूध भूकटीसाठी प्रतीकिलो 50 रुपये अनुदान द्यावेत अशा मागण्या करण्यात आल्या. पक्षाच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करुन आघाडी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना शेतकरी संघटनेचे संतोष रोहम म्हणाले, मागील तीन महिन्यांपासून विविध कारणांने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यापूर्वी करोनामुळे शेतकर्‍यांना आपला भाजीपाला फेकून द्यावा लागला. हीच परिस्थिती आता दूधाच्या संदर्भात झाली आहे. दूध संघांकडून शेतकर्‍यांवर अन्याय सुरु झाला आहे. 50 टक्के दूधाला 25 रुपये आणि 50 टक्के दूधाला 20 रुपये अशा प्रकारचा तुघलकी निर्णय करुन सरकारच्या निर्णयाची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारी कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठी सरकार कर्ज काढत आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांना अनूदान देण्यासाठी मात्र आखडता हात घेते ही परिस्थिती अन्यायकारक आहे. या तालुक्याचे लोकप्रतिनिधी सरकारमध्ये मंत्री आहेत. महानंदाचे चेअरमनही संगमनेर तालुक्यातील आहेत. परंतू हे शेतकर्‍यांचे आहेत की उद्योगपतींचे असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भास्करराव दिघे म्हणाले, दूध संघाने 20 रुपये देण्याचा निर्णय केला असला, तरी वेगवेगळ्या मार्गाने कपात करुन शेतकर्‍यांच्या हातात फक्त 17 ते 18 रुपये भाव पडत आहे. दूध धंद्यावर शेतकर्‍यांचा प्रपंच अवलंबून आहे. परंतू शासनाच्या भूमीकेमुळे दूध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागणार आहे. आमच्या घामाचे दाम आम्ही मागत आहोत. शेतकर्‍यांच्या भावनांचा अंत पाहू नका. दूधाच्या दरासंदर्भात योग्य निर्णय करा अन्यथा यापेक्षाही मोठ्या संख्येने येवून सरकारच्या दारात बसण्याचा इशारा त्यांनी दिला.

तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे म्हणाले, मागील युती सरकारने 25 रुपये हमीभाव देण्याचा घेतलेला निर्णय आघाडी सरकारने जाणिवपूर्वक दुर्लक्षित केला. 25 रुपयांचा हमीभाव जरी दिला असता, तरी शेतकर्‍यांना या संकटाच्या काळात आधार मिळाला असता. परंतू या सरकारने अडचणींची कारणे सांगून शेतकर्‍यांना उद्धवस्तच करण्याची भूमिका घेतली.

यावेळी डॉ. सोमनाथ कानवडे, वैभव लांडगे आदींची भाषणे झाली. यावेळी राजेश चौधरी, नानासाहेब खुळे, दादासाहेब गुंजाळ, विठ्ठलराव शिंदे, दिपक भगत, परिमल देशपांडे, अशोक शिंदे, विश्वनाथ कोल्हे, गजानन जोंधळे, अमोल दिघे, नानासाहेब दिघे, राजेंद्र सोनवणे, संजय नाकील, सचिन शिंदे, रविंद्र गाढे, भाऊसाहेब गुळवे, सचिन वर्पे, दिपेश ताटकर, सोमनाथ बोरसे, हासिफभाई शेख, विकास गुळवे आदी कार्यकर्ते शेतकरी सोशल डिस्टन्सींग ठेवून या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनातील प्रतिनिधीच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com