भाजपाने कायम कूटनितीचे राजकारण केले - ना. थोरात

भाजपाने कायम कूटनितीचे राजकारण केले - ना. थोरात

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

मागील पाच वर्षात भाजपाने शिवसेनेला कायम दुय्यम वागणूक दिली. आता या सरकारसाठी ते दररोज नवीन नवीन तारखा देत असून भविष्य सांगत आहेत. दिल्लीमध्ये शेतकर्‍यांच्या आंदोलनाला चिरडणार्‍या भाजपाला कधीही गोरगरीब व शेतकर्‍यांबद्दल सहानुभूती नाही. भाजपाने कायम कूटनितीचे राजकारण केले, अशी टीका राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

संगमनेर तालुक्यातील निमोण येथे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या जलपूजन कार्यक्रमात ना. थोरात बोलत होते. प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे, पंचायत समिती सदस्या मिराताई चकोर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य इंजि. बी. आर. चकोर, एकविरा फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, सह्याद्री संस्थेचे संचालक अ‍ॅड. ज्ञानेश्वर सांगळे, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत घूगे, प्रताप शेळके, बंडु भाबड, अनिल घुगे, दिप्ती सांगळे, दगडु घूगे, सुभाष सांगळे, भारत मुंगसे, साहेबराव मंडलिक, गंगाधर जायभाये आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

महसूलमंत्री थोरात म्हणाले, अनेक अडचणीवर मात करून निमोण प्रादेशिक पाणी योजना पूर्णत्वास आली आहे. या योजनेद्वारे निमोण, पळसखेडे, पिंपळे, सोनेवाडी, कर्हे या पाच गावांना शाश्वत पिण्याचे पाणी मिळणार आहे. निमोण परिसरातील गावांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. संगमनेर पंचायत समिती सदस्या मिराताई चकोर आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य इंजि. बी. आर. चकोर यांनी योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून ही स्वप्नवत योजना साकार झाली आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील टाकीत पाणी पोहोचणार आहे. पुढील टप्प्यामध्ये वाड्या - वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी काम केले जाईल. आपला तालुका, आपल्या सहकारी संस्था अत्यंत चांगल्या आहेत आणि हे काही लोकांना पहावत नाही. म्हणून ते स्थानिक काहींना हाताशी धरून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतात, त्याकडे दुर्लक्ष करा.

इंजि. बी. आर. चकोर म्हणाले, निमोण प्रादेशिक योजनेमुळे पाच गावांना पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. याकामी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी वरिष्ठ पातळीवर सर्व अडचणी सोडविल्या तसेच शासकीय पातळीवर इंद्रजित थोरात यांचीही मोलाची मदत झाली. त्यामुळेच ही योजना पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले

डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या, आज निमोण व परिसरातील गावांसाठी सोन्याचा दिवस आहे. ही मोठी योजना पूर्ण करण्याचे काम महसूलमंत्री थोरात यांनी केले. या योजनेमुळे आपल्या गावातील सर्वांना स्वच्छ पाणी मिळणार आहे. महसूलमंत्री थोरात यांच्यावर राज्यात मोठी जबाबदारी आहे. तरी ते आपल्या तालुक्यातील प्रत्येक नागरिकाची काळजी घेत आहेत.

अ‍ॅड. ज्ञानेश्वर सांगळे म्हणाले, निमोण आणि या भागावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायम प्रेम केले असून आज आपल्यासाठी मोठा निधी देऊन निमोण प्रादेशिक पाणी पुरवठा ही ऐतिहासिक योजना मार्गी लावली आहे. यापुढील काळातही सर्वांनी त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहावे.

प्रसंगी चंद्रकांत घुगे, जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रम प्रसंगी निमोण सोसायटीच्या नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

Related Stories

No stories found.