लोणी येथे होणारी सहकार परिषद ही राज्यासाठी मोठी उपलब्धी - अनासपुरे

लोणी येथे होणारी सहकार परिषद ही राज्यासाठी मोठी उपलब्धी - अनासपुरे

लोणी |प्रतिनिधी| Loni

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत संपन्न होणारी सहकार परिषद ही राज्यासाठी मोठी उपलब्धी आहे. केंद्र सरकारने सहकारा क्षेत्राबरोबरच कृषी क्षेत्रासाठी केलेल्या निर्णयांची माहिती या परिषदेच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनी केले.

प्रवरानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्याच्या पार्श्वभूमिवर सरचिटणीस रवी अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी लोकसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक लोणी येथे आयोजित करण्यात आली होती. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या बैठकीस माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार वैभव पिचड, सौ.स्नेहलता कोल्हे, उत्तर नगर जिल्ह्याचे संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, सरचिटणीस जालिंदर वाकचौरे, सुनील वाणी, रवीकाका बोरावके, ओबीसी आघाडीचे बाळासाहेब गाडेकर, नंदकुमार जेजूरकर, शेतकरी आघाडीचे सतीश कानवडे यांच्यासह सर्व तालुका अध्यक्ष आणि पक्षाच्या विविध आघाड्यांचे प्रमुख याप्रसंगी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना रवी अनासपुरे म्हणाले की, देशाच्या इतिहासात प्रथमच केंद्र सरकारने सहकार मंत्रालय स्थापन केले. पंतप्रधान मोदीजी घेत असलेल्या प्रत्येक निर्णयात दूरदृष्टी आणि व्यापकता आहे. येणार्‍या काळात केंद्र सरकारचे काम आपल्याला सामान्य माणसापर्यंत पोहोचवाचे आहे. सहकार परिषदेच्या निमित्ताने प्रत्येक शेतकर्‍याच्या बांधापर्यंत पोहोचण्याची संधी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आहे. दिनांक 16 डिसेंबर रोजी प्रधानमंत्री सेंद्रीय शेती या विषयावर देशातील शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत. सहकार परिषदेच्या पार्श्वभूमिवर मोदीजींचा शेतकर्‍यांशी होत असलेला संवादही राज्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे अनासपुरे यांनी नमुद केले.

आ.विखे पाटील म्हणाले की, केंद्रीय सहकार मंत्री झाल्यानंतर अमित शाह राज्यात प्रथमच येत आहेत. राज्यातील पहिल्या सहकार परिषदेचे आयोजन करण्याचा मान केंद्रीय नेतृत्वाने आपल्या जिल्ह्याला दिला. यापूर्वी सहकारी साखर कारखानदारीतले फक्त आम्हालाच कळते असे मानणार्‍यांनी सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर सहकार हा विषय राज्याच्या अखत्यारीत असल्याचा उल्लेख केला. परंतु त्यांनीच सहकारी चळवळ मोडीत काढली. सहकार चळवळीला बळकटी देण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यांनीच या चळवळीकडे पाठ फिरवीली.

या सर्व घटनांच्या पार्श्वभूमिवर प्रधानमंत्र्यांनी सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण आहे. अगामी सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर या परिषदेच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री अमित शाह देणारा संदेश हा राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास आ.विखे पाटील यांनी व्यक्त केला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवीकाका बोरावके यांचीही भाषणं झाली. भारतीय जनता युवा मोर्चाच्या राहाता तालुका कार्यकारिणीची घोषणा या बैठकीत करण्यात आली. केंद्र सरकारच्या दूरसंचार समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल आ.विखे पाटील यांच्याहस्ते अ‍ॅड.बोरावके यांचा सत्कार करण्यात आला.

राज्यात संपन्न झालेल्या विधान परिषद निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे, वसंत खंडेलवाल यांचा झालेला विजय हा भाजपा कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याची प्रतिक्रीया आ.विखे पाटील यांनी या बैठकीत व्यक्त केली. आगामी काळातील सर्वच निवडणुका आघाडी सरकार विरुध्द भाजप अशाच पध्दतीने होणार असल्याने जनतेच्या पाठबळावरच सर्व निवडणुकांना आपल्याला सामोरे जायचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com